New Delhi : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर मंगळवारी जोरदार टीका केली होती. ही टीका भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. तावडेंनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उल्लेख करत शरद पवारांवर पलटवार केला आहे.
विनोद तावडे यांनी सोशल मीडियातून शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटर मध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती, असे तावडेंनी म्हटले आहे.
दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा पवारसाहेब विसरले आहेत, असा निशाणाही तावडेंनी साधला आहे. तावडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचाही उल्लेख केला आहे.
तावडे यांनी म्हटले आहे की, दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का? श्रद्धेय अटलजी, अडवाणीजी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात 17 महिने तुरुंगात होते, ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधान झाले, त्यांच्याविषयी देखील हेच म्हटले असते का? हे पवारसाहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितले पाहिजे, असे सवाल तावडेंनी केले आहेत.
दरम्यान, शिर्डी येथील भाजपच्या अधिवेशनात अमित शाह यांनी शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकेची झोड उठवली होती. शरद पवार यांचा उल्लेख त्यांनी दगाबाज असाही केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शाह यांच्यावर प्रतिहल्ला केला होता. सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण आदींनी गृहमंत्री म्हणून मोलाचे योगदान दिले आहे, मात्र यापैकी कोणालाही त्यांच्या राज्यातून तडीपार करण्यात आले नव्हते, असे पवार म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.