Sharad Pawar 3 Sarkarnama
देश

Marathi Sahitya Sammelan 2025 : शरद पवारांना असलेली एक खंत; साहित्य संमेलनातून कशी दूर झाली

Sharad Pawar woman writer appointed president 98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2025 Delhi : दिल्लीतील साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार शेजारी बसलेले दिसले.

Pradeep Pendhare

Mumbai News : 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिल्लीत आजपासून सुरवात झाली असून, उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार होते. नरेंद्र मोदी आणि शरद पवार शेजारी बसले होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.तारा भवाळकर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना या साहित्य संमेलनातून एक खंत दूर झाल्याची भावना व्यक्त केली.

शरद पवारांनी (Sharad Pawar) साहित्य संमेलनाच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना, जुनी एक खंत बोलून दाखवली. आतापर्यंत एवढी संमलने झाली. पण फक्त चार महिलांना संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला. पण यावेळी एका महिला साहित्यिकाला अध्यक्षपदाचा मान मिळाला, याचा मला आनंद आहे, असे म्हटले.

दिल्लीत (Delhi) पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1954 साली झाले होते. तेव्हा देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यांनी संमेलनाचे उद्घाटन केले होते. जवाहरलाल नेहरूनंतर थेट 70 वर्षांनंतर मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे, आनंद देखील शरद पवार यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.

शरद पवार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, "संत परंपरेपासूनच सर्वसमावेशक विचार मांडण्याचे काम मराठी साहित्यिकांनी सातत्याने केले. महिला साहित्यिकांच्या योगदानाने मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम साहित्यिकांनी केले. साहित्यिकांची जबाबदारी वाढली असून समाजाला समाजसुधारकांच्या विधायक मार्गाने नेण्याचे काम साहित्यिकाने करण्याची आवश्यकता आहे".

नव्या पिढीला पुस्तकांशी बांधून ठेवण्यासाठी नव्या माध्यमांचा कल्पकतेने वापर करायला हवा. नव्या पिढीमध्ये साहित्याची गोडी टिकून राहिली तरच साहित्याला भवितव्य असेल. महिलांना अध्यक्षपदाचा मान अधिकाधिक मिळाला, तर महिला साहित्यिकांची परंपरा आणखी वेगाने पुढे जाईल. राजकारण आणि साहित्यातील संबंध पूर्वीपासून आहे, ते परस्पराला पूरक आहेत असेही पवार यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT