
Mumbai News : शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यावेळी दहावीची परीक्षा राज्यात काॅपीमुक्त झाली पाहिजे, असा चंग बांधला होता. त्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून त्यावर राज्यातील शिक्षण विभाग काम करत होता.
दहावीच्या आजच्या पहिल्या मराठी भाषेच्या पेपरवेळी या काॅपीमुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडाला. मराठी पेपर देखील परीक्षेपूर्वी लिक झाला. यावरून शिक्षणमंत्री दादा भुसे चांगलेच संतापले असून, आता काॅपी होणाऱ्या केंद्राची मान्यता रद्द करण्याबरोबर, केंद्रावरील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा केली आहे.
दादा भुसे म्हणाले, "राज्यात कॉपीमुक्त अभियानासाठी सरकारने सर्व विभागाच्या बैठका घेतल्या होत्या. दीड महिन्यांपासून तशी तयारी केली जात होती. प्रबोधन केले जात होते. विद्यार्थी (Student) आणि सर्व विभागांना दबाव न घेता परीक्षेला सामोरं जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. तरी देखील काही ठिकाणी कॉपी झाली, कॉपी पुरविण्याचे प्रकार समोर आले. समाज माध्यमांवर तशा चित्र फित देखील प्रसारीत झाल्याचे समोर आले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे".
यापूर्वी ज्या केंद्रावर कॉपी झाली आहे, ते केंद्र रद्द करण्यात आले. त्यात बदल देखील करण्यात आला. त्याचबरोबर यापूर्वी ज्या केंद्रावर कॉपी झाली आहे, तिथे प्रशासन देखील बदलण्यात आला आहे. असे असतानाही कॉपीचे प्रकार समोर आले असतील त्याची गंभीर दखल घेतली जाणार असल्याचे दादा भुसेंनी (Dada Bhuse) सांगितले.
कॉपी पुरविणाऱ्यावर कारवाई केली जाईल. तसेच कॉपीसाठी सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर करवाई केली जाईल. येणाऱ्या काळात ते केंद्र दहावीच्या परिक्षेसाठी रद्द केले जाईल. अनेक उपाय योजनांपैकी ड्रोन हा एक भाग आहे.पोलिस प्रशासन, शिक्षण, महसूल ग्रामविकास अधिकाऱ्यांवर सामूहिक जबाबदारी देण्यात आल्याची माहिती दादा भुसेंनी दिली.जिथे कुठ कॉपीचा प्रकार झाला असेल, त्याची गंभीर दखल घेवून यापुढे कॉपी होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशाही सूचना दिल्याचे दादा भुसेंनी सांगितले.
मराठी पेपर फुटीची प्राथमिक चौकशी केली आहे. यात हस्तलिखित प्रत बाहेर आली आहे. परीक्षेचा पेपर आणि बाहेर आलेले हस्तलिखित यात प्राथमिक पातळीवर भिन्नता आहे. तरी त्याची सविस्तर दखल घेवून त्याची सखोल चौकशीचा आदेश दिला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीत जे पुढे येईल, जी वास्तवता असेल त्यानुसार करवाई केली होईल, असे दादा भुसेंनी सांगितले.
विषय मराठी, असो की, कोणताही, कॉपीमुक्त अभियानाची सूचना करण्यात आली होती. आता जिथे कॉपी होईल, अशा केंद्रांना यापुढे मान्यता देण्यात येणार नाही. माझा असा दावा नाही की, लगेच त्यात बदल होईल. मात्र आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी मेहनत घेतात. शिक्षक देखील समर्पित भावनेतून ज्ञानदानाचे काम करीत असता त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका दादा भुसे यांनी मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.