Waqf Bill News : वक्फ सुधारित विधेयकावर चर्चेदरम्यान लोकसभेत दोन्ही शिवसेना आमनेसामने आल्या. सुरूवातीला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून अरविंद सावंत यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके बोलले. लगेच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी बोलण्यास सुरूवात केली. त्यांनी सावंतांच्या भाषणाचा चांगला समाचार घेतला.
सावंत यांनी या विधेयकावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. मात्र, त्यांनी एकदाही या विधेयकाला समर्थन नाही, असे स्पष्ट केले नाही. ते म्हणाले, विधेयकात जे चुकीचे आहे, त्याचे आम्ही समर्थन करणार नाही. जे चुकीचे आहे ते सुधारा. बोर्डसाठी आधी निवडणूक व्हायची, आता निवड होईल. सरकारला जे वाटेल ते नेमतील. महिलांचा समावेश 1995 च्या कायद्यातही आहे, ते नवे नाही. त्यामुळे हे विधेयक चांगल्या मनाने आणले आहे का, अशी शंका सावंत यांनी उपस्थित केली.
बोर्डामध्ये गैर मुस्लिम सदस्य नेमणुकीसही सावंत यांनी विरोध केला. हिंदू मंदिरांमध्येही गैर हिंदू आणू शकता, अशी भीती वाटते. हिंदूच्या मंदिरांच्या बोर्डवर असे गैर हिंदू आणण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना त्याला विरोध करेल. हे पुढे जाऊन ख्रिश्चन, शीख धर्मांबाबतही होऊ शकते, असेही सावंत म्हणाले.
कलम 370 हटवताना मी मंत्री होतो. पण आता किती हिंदू काश्मीर आले, ते सांगा. जमीन कोण खरेदी करत आहे. हिंदू देवस्थानांची जमीन विकली जात आहे. तुमचा हेतू स्पष्ट होत नाही. तुमच्या मनात काही वेगळेच आहे. जमीन हडपायची आहे. जसे काश्मीरमध्ये सुरू आहे. मणिपूरमध्येही त्यासाठीच सुरू आहे. कोणत्या उद्योगपतींसाठी हे सुरू आहे, हे सर्वांना माहिती आहे.
सावंत यांच्या भाषणानंतर निलेश लंके बोलले. त्यानंतर लगेच श्रीकांत शिंदे बोलण्यासाठी उभे राहिले. ते बोलू लागताच पळाले... पळाले... असा आवाज आला. श्रीकांत शिंदे यांच्या बाजूला बसलेले खासदार धैर्यशील माने यांनी पळाले... पळाले... म्हणत शिंदे यांचे लक्ष सावंतांकडे वेधले. त्यावेळी सावंत सभागृहातून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शिंदेंनीही बसा..बसा.. म्हणत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
भाषणादरम्यान शिंदे यांनी सावंताच्या पेहरावावरूनही टोला लगावला. आज बुधवारसाठी हिरवे जॅकेट घालून आले आहे की खास आजच्या दिवसासाठी ड्रेसअप केला आहे, असा टोला त्यांनी लगावला. भाषणादरम्यान बोलताना शिंदे म्हणाले, अरविंद सावंत यांचे भाषण ऐकताना वेदना झाल्या. यूबीटीवाल्यांनी आपल्या अंतरात्म्याला प्रश्न विचारायला हवा की, बाळासाहेब असते तर आज हे इथे भाषण करू शकले असते का?
आज सभागृहात एक गोष्ट स्पष्ट झाली की, यूबीटीवाले कुणाच्या विचारधारेच्या आधारे विधेयकाला विरोध करत आहेत. आज त्यांच्याकडे एक सोनेरी संधी होती, आपल्या चुका सुधारण्याचा, आपला इतिहास टिकवण्याचा आणि विचारधारा जिवंत ठेवण्याचा, ज्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी आंदोलन केले होते. पण त्यांनी आधीच बाळासाहेबांच्या विचारधारा बुलडोझरखाली चिरडली आहे, अशी टीका शिंदेंनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.