Siddaramaiah Sting Operation Case Sarkarnama
देश

Siddaramaiah Sting Operation Case : सिद्धरामय्या स्टिंग ऑपरेशनवरून खर्गे-कुमारस्वामी आमनेसामने; अटकेच्या इशाऱ्याने संघर्ष तीव्र

Priyank Kharge warns H D Kumaraswamy of questioning as the Siddaramaiah sting operation controversy escalates in Karnataka : सिद्धरामय्या यांच्याविरोधातील कथित स्टिंग ऑपरेशन प्रकरणात प्रियांक खर्गे यांचा कुमारस्वामी यांना सूचक इशारा; मुख्य व्यक्तीला अटक करण्यासाठी कुमारस्वामी यांची पोलिसांना दोन दिवसांची मुदत.

Pradeep Pendhare

Karnataka political controversy : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधातील कथित स्टिंग ऑपरेशन प्रकरणावरून गृहमंत्री प्रियांक खर्गे आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.

या प्रकरणात तक्रार मिळाल्यानंतर काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी केल्याचे सांगतानाच, संशय निर्माण झाल्यास कुमारस्वामी यांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल, असा इशारा खर्गे यांनी दिला. दरम्यान, कुमारस्वामी यांनी खर्गे यांच्यावर गंभीर आरोप करत स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या मुख्य व्यक्तीवर कारवाई करण्याऐवजी निरपराधांना लक्ष्य केले जात असल्याचा दावा केला.

विधानसौधच्या केंगाल प्रवेशद्वाराजवळ पत्रकारांशी बोलताना काँग्रेस (Congress) मंत्री खर्गे यांनी, केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणे शक्य नाही. आमच्याकडे तक्रार आली आहे. त्यामुळे काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. कुमारस्वामी यांच्याबाबत संशय निर्माण झाल्यास त्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी करू, असा सूचक इशारा दिला आहे.

कुमारस्वामी यांनी एकेरी भाषेत बोलल्याने आपण घाबरून जाऊ किंवा त्यांच्या धमक्यांना बळी पडू, असे त्यांना वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. कुमारस्वामी यांनी सन्मानपूर्वक संवाद साधल्यास त्यांचे म्हणणे ऐकण्यास आपण तयार आहोत. मात्र ते ज्या भाषेत बोलतील, त्याच भाषेत उत्तर देण्यासही आपण सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

धाडस असेल तर मला अटक करून दाखवा, या कुमारस्वामी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना खर्गे म्हणाले, कोणालाही विनाकारण अटक करता येत नाही. प्रकरणासंबंधी त्यांच्याकडे कागदपत्रे आणि ठोस पुरावे असतील, तर ते सादर करावेत. पुराव्यांतून चुकीचे कृत्य स्पष्ट झाल्यास संबंधितांवर निश्चितच कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. कुमारस्वामी यांनी पुरावे असल्यास पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात तक्रार दाखल करावी, असे आवाहनही खर्गे यांनी केले.

प्रियांक खर्गे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

सिद्धरामय्या यांच्या विरोधातील कथित स्टिंग ऑपरेशनच्या कटात प्रियांक खर्गे सहभागी असल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केला. स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या मुख्य व्यक्तीवर कारवाई करण्याऐवजी निरपराधांना लक्ष्य केले जात असल्याचा दावा करत त्यांनी खर्गे यांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

कुमारस्वामी यांचे आंदोलन अन् पोलिसांचे आश्वासन

स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ प्रसारित केल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित प्रमुख व्यक्तीला अटक करावी, या मागणीसाठी केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी बंगळूरच्या पोलिस आयुक्त कार्यालयाच्या आवारात आमदारांसह धरणे आंदोलन केले. संबंधित व्यक्तीला अटक करण्यासाठी त्यांनी पोलिसांना दोन दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पोलिस आयुक्तांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुमारस्वामी यांनी आंदोलन मागे घेतले; मात्र कारवाईसाठी दोन दिवसांची मुदत दिली.

कुमारस्वामी यांचे गंभीर आरोप

काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीला अटक करून, या प्रकरणात आपले नाव घेण्यासाठी दबाव टाकल्याच्या आरोपाची चौकशी करावी, अशी मागणी कुमारस्वामी यांनी केली. तसेच संबंधित व्यक्ती आणि राकेश यांच्यातील संबंध उघड करावेत, असेही ते म्हणाले. या प्रकरणाची माहिती माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना असूनही कारवाई केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT