

Congress organisational reshuffle : मतदारयाद्यांच्या घोळावरून काँग्रेस दिल्लीत एकवटत असतानाच, अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून, काँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहिले.
तालुकाध्यक्षपदाच्या निवडीत निष्ठावंतांना डावलून, बाहेरील व्यक्तीला संधी दिल्याच्या आरोपावरून, तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले यांच्यासह संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. पत्रकार परिषद घेत रोहोकले यांनी ही घोषणा केली.
काँग्रेसचे (Congress) कार्याध्यक्ष सुरेश मेसे, बाळासाहेब रोहोकले, युवक तालुकाध्यक्ष योगेश शिंदे, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष गणी इनामदार, सेवादल अध्यक्ष संजय मेचे, ओबीसी सेलचे अरविंद लोंढे, मागासवर्गीय सेलचे अजित साळवे, सरचिटणीस अभिजित कारखिले, यश राहाणे, बेबीताई गोरडे, रावसाहेब सांगळे, सुनील व्यवहारे, तेजस सकट, शैलजा कारखिले, गोरख रोहोकले, संजय रासकर, रामदास ठुबे, संतोष काकडे, अजित सांगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रोहोकले म्हणाले, ‘‘मी 1985 सालापासून काँग्रेसचे काम करतोय. दिवंगत लोकनेते बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासोबत काम केले. 2019 मध्ये विखे पाटील परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही मी काँग्रेसमध्येच राहिलो. बाळासाहेब थोरात यांनी माझ्यावर तालुकाध्यक्षपदाची धुरा सोपवली होती. गेल्या आठ वर्षांत वाडी-वस्तीवर जाऊन पक्ष वाढवण्याचे काम मी केले आहे."
26 ऑक्टोबरला जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी तालुकाध्यक्ष फेरबदल बैठक बोलावली होती. त्या बैठकीनंतर मी दूध संघाच्या सभेला गेलो असताना, ज्ञानदेव वाफारे यांनी पक्षाबाहेरील कार्यकर्त्यांना बोलावून ईश्वर दिवटे यांच्या नावाचा ठराव झाल्याचे वरिष्ठांना भासवले. त्यांनी कधी काँग्रेसचे काम केले नाही, जे पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाहीत, त्यांना अध्यक्ष केले. ही निवड आम्हाला मान्य नाही, असे सांगत माजी मंत्री थोरात यांनी विश्वासात घेतल्याशिवाय फेरबदल करणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनीही शब्द पाळला नाही, असा आरोपही रोहोकले यांनी केला.
युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश शिंदे यांनी, तालुकाध्यक्ष रोहोकले यांनी पक्ष वाढीसाठी प्रामाणिक काम केले आहे. निष्ठावंतांना डावलल्याने आम्ही सर्व नाराज आहोत. मी सुद्धा राज्याच्या युवा अध्यक्ष यांच्याकडे राजीनामा देणार आहे, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.