Sonam Wangchuk : भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीवरून लेह-लडाखमध्ये सध्या अस्वस्थतेचे वातावरण आहे. या मागणीसाठी सोनम वांगचूक यांचे गेल्या १५ दिवसांपासून उपोषण सुरू होते. मात्र बुधवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर वांगचूक यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
बुधवारी झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये आतापर्यंत ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत तर चार जणांना जीव गमवावा लागला आहे. या घटनांनंतर वांगचूक यांनी उपोषण संपवले. पण आता वांगचूक यांचा हेतू आणि त्यामागील पाकिस्तानी कनेक्शनची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
सोनम वांगचूक गेले होते पाकिस्तानला :
याच वर्षी फेब्रुवारीमध्ये वांगचूक पाकिस्तानमध्ये गेले होते. ६ फेब्रुवारी रोजी इस्लामाबादमध्ये झालेल्या एका हवामान परिषदेत वांगचूक सहभागी झाले होते. 'द डॉन' या पाकिस्तानी माध्यम समूहाने या परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेदरम्यान वांगचूक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते.
पाकिस्तान दौऱ्याबद्दल वांगचूक यांचे स्पष्टीकरण
पाकिस्तानमध्ये जाण्यावरून वांगचूक यांना त्यावेळीही अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले होते. 'पर्यावरणाला कोणतीही सीमा नसते' अशी भूमिका वांगचूक यांनी घेतली होती. आता लेह-लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर वांगचूक यांच्या त्या पाकिस्तान भेटीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गृह मंत्रालयाची आक्रमक भूमिका
लेह-लडाखमधील परिस्थितीसंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी तातडीने एक पत्रक प्रसिद्ध करत सरकारची भूमिका जाहीर केली. या प्रसिद्धी पत्रकामध्ये गृह मंत्रालयाने वांगचूक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आंदोलनाला हिंसक वळण देण्यासाठी वांगचूक यांनाच जबाबदार ठरवण्यात आले आहे.
'वांगचूक यांनी केलेल्या मागण्यांची दखल यापूर्वीच घेण्यात आली आहे. उच्च अधिकार समितीबरोबर सुरु असलेल्या चर्चांमध्येही या मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत उपोषण सोडावे, अशी विनंती अनेक राजकीय नेत्यांनी केली. पण त्याकडे दुर्लक्ष करत वांगचूक यांनी उपोषण सुरुच ठेवले व आंदोलकांना भडकावण्यासाठी विधानेही केली,' असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
वांगचूक यांच्यामुळेच भडकला हिंसाचार?
'२४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास एका जमावाने उपोषण स्थळावरून आक्रमक भूमिका घेत एका राजकीय पक्षाचे कार्यालय व एका सरकारी कार्यालयावर हल्ला केला. वांगचूक यांच्या भडकाऊ विधानांमुळे हे घडले. या जमावाने सुरक्षा दलांवरही हल्ले केले. दुपारी चारपर्यंत ही परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली', असेही सरकारने म्हटले आहे.
वांगचूक प्रकरणात CBI चाही प्रवेश
सोनम वांगचूक यांनी स्थापन केलेल्या संस्थेने परदेशी निधीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवरून आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात गुरुवारी माहिती देण्यात आली. या प्रकरणी वांगचूक यांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्यांनी अद्याप हजेरी लावलेली नाही, असे 'हिंदुस्तान टाईम्स'च्या बातमीत म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.