Sonia Gandhi news sarkarnama
देश

संतप्त सोनियांनी स्मृती इराणींना फटकारले... अखेरीस सुप्रिया सुळेंनी केली मध्यस्थी!

Loksabha news : सोनिया गांधी पहिल्यांदाच इतक्या संतप्त झाल्याचे दिसून आले...

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : लोकसभेचा आजचा दिवस सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यामुळे गाजला. सोनिया खरे तर कधी आक्रमक होत नाहीत. पण स्मृती इराणी (Smruti Irani) यांना त्यांनी सुनावल्याचे तोच चर्चेचा विषय झाला. भाजपने त्यावरून आकांडतांडव करत सोनियांविरुद्ध जोरदार टीका केली. या वादात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मध्यस्थी केल्याने पुढील वाद थांबला.

काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींबद्दल काढलेल्या अनुद्गारांवरून लोकसभेत आज भाजपच्या नेत्या स्मृती इराणी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात जोरदार वाद झाला. दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाल्याने सभागृहातील वातावरण तापले होते. अखेर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोनिया गांधी यांना विनंती करून सभागृहाबाहेर नेल्याने तणाव कमी झाला.

काँग्रेसच्या खासदार गीता कौर आणि ज्योत्स्ना महंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेतील गोंधळानंतर सभागृह स्थगित असताना भाजपच्या घोषणाबाजीमुळे अस्वस्थ झालेल्या सोनिया गांधींनी सत्ताधारी बाकांकडे जात भाजपच्या वरिष्ठ खासदार रमा देवी यांना या प्रकारामागचे कारण विचारले. लोकसभेच्या अध्यक्षांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज चालविणाऱ्या तालिका सदस्यांमध्ये रमा देवी यांचाही समावेश आहे. ‘मला यात का ओढले जात आहे, मी काय केले आहे,’ असा सवाल सोनिया गांधींनी त्यांना केला. त्यावर रमा देवी यांनी सांगितले, की तुम्ही काँग्रेसच्या अध्यक्ष असून अधीर रंजन चौधरी यांची गटनेतेपदी तुम्हीच नियुक्ती केली असल्यामुळेच हे होत आहे. रमा देवी आणि सोनिया गांधींमध्ये बातचित सुरू असताना मंत्री स्मृती इराणी यांनी तेथे येत सोनिया गांधींशी बोलण्याचा प्रयत्न केला. स्मृती इराणी यांनी प्रश्‍न विचारण्यास सुरुवात करताच, ‘मी तुमच्याशी बोलत नाही, त्यामुळे मध्ये बोलू नका,’ अशा आशयाचे विधान सोनिया गांधींनी केले. यावरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि वातावरण तापले.

सुप्रिया सुळेंनी केली मध्यस्थी
यामध्ये भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सरसावण्याचा प्रयत्न करताच संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांना रोखले. मात्र, संतप्त झालेल्या स्मृती इरानी सोनिया गांधींशी आक्रमक सुरात बोलताना दिसून आल्या. वातावरण तापल्याचे दिसताच तृणमूल काँग्रेसच्या खासदार अपरुपा पोद्दार यांनी सोनिया आणि स्मृती इरानी यांच्यामध्ये जाऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. सोबतच काँग्रेसच्याबाजूने गौरव गोगोई, रवनीतसिंग बिट्टू हे देखील पुढे आले. हा गोंधळ वाढत असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढे होत अक्षरशः हात जोडत सोनिया गांधींना विनंती करून सभागृहाच्या बाहेर नेले. यामुळे सभागृहात तणाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरून घोषणाबाजी सुरूच राहिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT