Vladimir Putin and SBI
Vladimir Putin and SBI  Sarkarnama
देश

रशियाला दणका! आता 'एसबीआयने'ही घातले आर्थिक निर्बंध

सरकारनामा ब्युरो

किव्ह : युक्रेनवर (Ukraine) आक्रमण केल्यामुळे रशियाची (Russia) जागतिक पातळीवर कोंडी केली जात आहे. यासाठी रशियावर आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्यात आले आहेत. आता भारताच्या स्टेट बँक ऑफ इंडियानेही रशियाला दणका दिला आहे. रशियातील कंपन्यांच्या व्यवहारांवर एसबीआयने निर्बंध घातले आहेत. एसबीआयने (SBI) रशियन कंपन्यांवर घातलेले आर्थिक निर्बंध हे आंतरराष्ट्रीय निर्बंधांचाच भाग आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एसबीआयच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा विस्तार आहे. यामुळे अमेरिका आणि युरोपियन युनियनने घातलेल्या निर्बंधांचे एसबीआयला पालन करावे लागते. अमेरिका आणि युरोपियन युनियनने रशियावर निर्बंध घालताच त्याचे पालन एसबीआयने केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, एसबीआयची 31 ऑक्टोबर 2021 अखेर विदेशात 74 कार्यालये होती. यात वॉशिंग्टनमध्ये महत्वाचे कार्यालय असून, अमेरिकेतील कॅलिफोर्निया, ब्रिटन आणि कॅनडा येथे एसबीआयच्या उपकंपन्या कार्यरत आहेत. एसबीआय आणि कॅनरा बँकेच्या संयुक्त मालकीच्या कमर्शियल इंडो बँक रशियात कार्यरत आहेत. या बँकेत एसबीआयचा हिस्सा 60 टक्के तर कॅनरा बँकेचा 40 टक्के हिस्सा आहे. (Russia-Ukraine War Updates)

दरम्यान, युद्धाच्या भीतीने एकाच आठवड्यात युक्रेनमधील सुमारे दहा लाख नागरिकांनी स्थलांतर केले आहे. या स्थलांतरितांचा लोंढा शेजारील देशांमध्ये धडकत आहे. युक्रेनमधील स्थलांतर हे अत्यंत मोठ्या संख्येने झालेले या शतकातील हे सर्वांत वेगवान स्थलांतर असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतर विभागाने याबाबत आकडेवारी जाहीर केली. युक्रेनवर रशियाने तीन बाजूंनी केलेल्या आक्रमणामुळे अनेक नागरिक जीवाच्या आकांताने देश सोडून पलायन करीत आहेत. युरोपमधील शेजारी देश असलेल्या पोलंडसह रोमानिया आणि इतर देशांमध्ये हे युक्रेनचे नागरिक आश्रय घेत आहेत.

गेल्या आठवड्यात झालेल्या रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनच्या एकूण लोकसंख्येपैकी दोन टक्के नागरिकांनी देशाबाहेर आश्रय घेतला आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी सांगितले आहे. युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खारकिव्हवर रशियाने हल्ले सुरु ठेवले आहेत. यामुळे या शहरातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. हजारो नागरिक मिळेल त्या वाहनाने शहर सोडत आहेत. किव्ह शहरात रोजच रशियाकडून बाँबहल्ले सुरू आहेत. याचबरोबर क्षेपणास्त्र हल्लेही होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT