Narendra Modi and Petrol Pump
Narendra Modi and Petrol Pump Sarkarnama
देश

हा तर देशद्रोहच..! पेट्रोल दरवाढीवरून भाजपच्या बड्या नेत्याचा सरकारला घरचा आहेर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ऐन उन्हाळ्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. मागील 15 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली असून, आतापर्यंतची ही वाढ 9.20 रुपयांवर गेली आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांची होरपळ सुरू आहे. यावरुन भाजपच्या (BJP) बड्या नेत्याने आपल्याच सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. (Petrol Diesel price hike News)

पेट्रोल, डिझेलची दरवाढ देशात अस्थिरता आणि बंडाचे वातावरण निर्माण करु शकते, असा गंभीर इशारा भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पेट्रोल, डिझेल, केरोसिनच्या दरात दररोज सुरू असलेल्या वाढीमुळे देशात बंडाची परिस्थिती निर्माण होत आहे. पेट्रोल, डिझेलची दरवाढ ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी आहे. याचबरोबर हा देशद्रोहही आहे. इंधन दरवाढ करून अर्थसंकल्पीय तूट भरुन काढणे म्हणजे स्वत:ची अकार्यक्षमता लपवणे आहे.

सुमारे साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील 15 दिवसांत 13 वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 8.40 रुपयांनी महागले आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 104.61 रुपये झाला असून, डिझेलचा दर 95.87 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर 85 पैसे वाढ करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 119.76 रुपये आणि डिझेलचा दर 103.92 रुपये आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 12 ते 25 रुपयांपर्यंत वाढ होईल, असा इशारा विश्लेषकांनी आधीच दिला होता.

रशियाने युक्रेनवर पुकारलेल्या युद्धाचे चटके आता सगळ्यांनाच बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. खनिज तेलाचा भाव आता प्रतिबॅरल 110 डॉलरवर गेला आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. असे असतानाही उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर सुमारे चार महिने स्थिर होते. या निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात आता वाढ सुरू झाली आहे. याआधी सीएनजीचा दरात सातत्याने वाढ करण्यात आली असून, यानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचा नंबर लागला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT