BSP Leader Afzal Ansari Sarkarnama
देश

Supreme Court : राहुल गांधी केसचा संदर्भ देताच बसपा नेत्याला दिलासा; पुन्हा मिळणार खासदारकी

Afzal Ansari : अन्सारी हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत.

Rajanand More

Rahul Gandhi Case : उत्तर प्रदेशातील गाजीपूर लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले अफजल अन्सारी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिला दिला आहे. न्यायालयाने गँगस्टर कायद्यानुसार त्यांना झालेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. या शिक्षेमुळे अन्सारी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. अन्सारी यांनी सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधी केसचा संदर्भ दिला होता. त्यामुळे त्यांना खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अन्सारी हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. ते गँगस्टर मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) याचे बंधू आहेत. त्यांनी या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांचा पराभव केला होता. काही महिन्यांपुर्वीच विशेष न्यायालयाने त्यांना गँगस्टर कायद्यानुसार (Gangster Act) दोषी ठरवत चार वर्षांची शिक्षा ठोठावली होती. न्यायालयाच्या या निकालानंतर कायद्यानुसार त्यांची खासदारकी गेली होती.

शिक्षेविरोधात अन्सारी यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाद मागितली होती. त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) प्रकरणाचा संदर्भ देत शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. अन्सारी यांचे वकील अभिषक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhavi) यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, न्यायालयाने सर्व बाजूने विचार करायला हवा. त्यांच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास त्यांचा गाजीपूर हा लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघ प्रतिनिधित्व करायला कोणीच नसेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अन्सारी हे संसदेतील विविध स्थायी समित्यांचे सदस्य होते. ते सदस्यच राहिले नाही तर या समित्यांमध्येही योगदान देऊ शकणार नाही, असा मुद्दाही सिंघवी यांनी उपस्थित केला. राहुल गांधी प्रकरणातही वकीलांनी मतदारसंघाचा मुद्दा उपस्थित करून शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. अन्सारी यांना 29 एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात आली होती.

अन्सारी यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली. त्याचप्रमाणे अलाहाबाद न्यायालयाने 30 जून 2024 पूर्वी सुनावणी पूर्ण करून या प्रकरणाचा निकाल द्यावा, असे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे अन्सारी यांना पुन्हा खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ते संसदेच्या कामकाजातही सहभाग घेऊ शकतात. दरम्यान, बदनामीच्या प्रकरणामध्ये गुजराजमधील न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर शिक्षेला स्थगिती मिळाली.

(Edited By - Rajanand More) 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT