Bihar News: अयोध्येमध्ये भगवान श्रीरामांच्या भव्य मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जानेवारीमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात राम मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. श्रीराम मंदिर साकार होत असताना असंख्य भारतीयांना या मंदिराला भेट देण्याची इच्छा आहे.
दरम्यान, नागरिकांच्या याच श्रद्धा आणि भावनेचा उपयोग सत्ताधारी भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी करण्याची तयारी सुरू झाली आहे. प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होताच बिहारमधील 50 लाख नागरिकांना अयोध्येला दर्शनासाठी घेऊन जाण्याचे नियोजन भाजपकडून सुरू करण्यात आले आहे.
अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी श्रीरामांच्या मूर्तीची नव्याने बांधण्यात येत असलेल्या भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यातच 2024 मध्येच लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजप लाखोंचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान श्रीराम मंदिराच्या निर्मितीचे निवडणुकीसाठी भांडवल करण्याची संधी सोडणार नाही. तशी त्यांनी तयारीही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीपासूनच केली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अमित शाह यांनी निवडणूक प्रचारात मतदारांना मोफत दर्शनाचे आश्वासनही दिले होते. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बिहारमधील सर्व विधानसभा मतदारसंघातून सुमारे 50 लाख भाविकांना अयोध्येला दर्शनासाठी घेऊन जाण्याचे नियोजन सुरू केले आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदारांना भाजपच्या बाजून आकर्षित करण्यासाठी भाजप सर्वस्तरावर प्रयत्न करत आहेत. त्यातच 22 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. या कार्यक्रमाचेही भाजपकडून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषद, आरएसएस आणि इतर हिंदूत्ववादी संघटनांची मदत घेतली जात असून त्यांनी बिहार राज्यातील विधानसभा मतदारसंघानुसार अयोध्या दर्शनाचे निमंत्रण देण्यासही सुरुवात केली असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच या कार्यक्रमादिवशी ग्रामीण भागात मोठं-मोठे स्क्रीन लावून थेट प्रेक्षपण करण्याचेही नियोजन करण्यात येत असल्याची चर्चा आहे. बिहारमधील मतदारांना श्रीराम मंदिराच्या दर्शनाला घेऊन जाण्यासाठी नुकतेच पटणामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या सर्व सदस्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये बिहारमधून सुमारे 50 लाख मतदार भाविकांना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रण पत्रिका आणि एक फोटो देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, यापूर्वी पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपची सत्ता आल्यास आम्ही मतदारांना श्री रामांचे मोफत दर्शन घडवून आणू असे आश्वासन दिले होते. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी श्रीरामाने भाजपला एजंट म्हणून नेमले आहे का ? असा सवाल करत जोरदार टीका केली होती. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित शाहांनी आता टूर अँड ट्रॅव्हल्स, असं नवीन खातं उघडले असेल, असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला होता.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.