Vijaykanth Sarkarnama
देश

Captain Vijaykanth : राजकारणातील ‘कॅप्टन’ला कोरोनाने हरवलं; विजयकांत यांचं निधन

Rajanand More

Tamil Nadu News : तमिळनाडूतील देसिया मुरपोक्कू द्रविड कडगम (DMDK) पक्षाचे संस्थापक, अभिनेते विजयकांत यांचे गुरूवारी सकाळी कोरोनामुळे निधन झाले. कॅप्टन म्हणून ओळख असलेले विजयकांत 71 वर्षांचे होते. चेन्नई येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

विजयकांत (Vijaykanth) यांना मंगळवारी श्वसनास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना रात्रीपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याआधी त्यांची कोरोना (Covid 19) चाचणी पॉझिटिव्ह आली होती. नोव्हेंबर महिन्यातही त्यांना प्रकृती ठीक नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

विजयकांत हे तमिळ चित्रपटसृष्टीत कॅप्टन म्हणून प्रसिध्द होते. राजकाराणात (Politics) पाऊल ठेवण्यापुर्वी त्यांनी 154 चित्रपटांमध्ये काम केले. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक बदल करण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते. त्यांनी 2006 मध्ये देसिया मुरपोक्कू द्रविड कडगम पक्षाची स्थापना करून राजकारणात प्रवेश केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2006 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) त्यांच्या पक्षाने तमिळनाडूतील सर्व जागा लढवल्या होत्या. त्यांच्या पक्षाला जवळपास 10 टक्के मतदान झाले होते. पण एकही उमेदवार विजयी झाला नव्हता. 2011 ची निवडणूक मात्र त्यांच्यासाठी महत्वाची ठरली. या निवडणुकीत त्यांनी एआयएडीएमके पक्षाशी युती करत 41 जागांवर उमेदवार उभे केले. त्यापैकी 26 उमेदवार विधानसभेत गेले.

कॅप्टनच्या पक्षाने 2011 च्या निवडणुकीत इतिहास घडवला होता. सध्या सत्तेत असलेल्या डीएमकेपेक्षा त्यांना अधिक जागा मिळाल्या होत्या. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून त्यावेळी विजयकांत यांचा पक्ष उदयास आला. 2011-16 या कालावधी ते विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर त्यांनी युती तोडली आणि आमदारांनी राजीनामे दिले.

2011 चे वर्ष वगळता पुढच्या कोणत्याही निवडणुकीत त्यांना प्रभाव पाडता आला नाही. पक्षाची मतदारांची टक्केवारीही कमी होत गेली. 2014 मध्ये एनडीएमध्ये सहभागी होऊनही त्यांना लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. विजयकांत यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव पक्षामध्ये ते फारसे सक्रीय नसल्याचे सांगितले जात होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT