CM Vijay Thalapathy Tamil Nadu Government Maternity Leave Sarkarnama
देश

Maternity Leave : सरकारी महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, तिसऱ्या अपत्यासाठी वर्षभराची प्रसूती रजा; तामिळनाडू सरकारचा निर्णय

Tamil Nadu Government New Maternity Leave Rule : तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय (थलपती विजय) यांनी काहीच दिवसांपूर्वी बळीराजासाठी अत्यंत मोठा निर्णय घेतल्यानंतर आता राज्यातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

Aslam Shanedivan

Tamil Nadu Government News : तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी काहीच दिवसांपूर्वी बळीराजासाठी मोठा निर्णय घेत ऊस आणि भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. यापाठोपाठ आता त्यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने आणखी एक निर्णय घेत सरकारी महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता तिसऱ्या अपत्यासाठी पूर्ण १ वर्षाची प्रसूती रजा मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून महिलांच्या कल्याणाच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी कृषी क्षेत्रासाठी विशेष प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केली होती. केंद्र सरकारने २०२५-२६ या हंगामासाठी उसाला जाहीर केलेल्या ३ हजार २९० रुपये प्रतिटन एफआरपीवर (FRP) राज्य सरकारकडून ७०९ रुपयांचे अतिरिक्त अनुदान दिले जाईल, अशी त्यांनी घोषणा केली. या निर्णयामुळे राज्यातील ऊस आणि भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे.

आता शेतकऱ्यांपाठोपाठ राज्य सरकारने सरकारी महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महिला सरकारी कर्मचाऱ्यांना तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही 365 दिवस म्हणजेच एक वर्षाची प्रसूती रजा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हा कालावधी 12 आठवड्यांचा म्हणजेच 84 दिवसांचा होता.

पण आता कालावधीत मोठा बदल करण्यात आला असून तो थेट वर्षभरासाठी करण्यात आला आहे. आता या निर्णयाप्रमाणेच पहिल्या दोन अपत्यांप्रमाणेच तिसऱ्या अपत्यासाठीदेखील पूर्ण एका वर्षाची रजा मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे आता राज्यातील महिलांकडून स्वागत केले जात आहे.

याबाबत मनुष्यबळ व्यवस्थापन मंत्री डी. सरथकुमार यांनी विधानसभेत विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान घोषणा केली. सरथकुमार यांनी सांगितले की, या नवीन नियमाची अंमलबजावणी करणारा शासकीय आदेश लवकरच जारी केला जाईल. तसेच तामिळनाडू सरकार हे सामाजिक कल्याण आणि महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देणारे कल्याणकारी सरकार असल्याचेही ते म्हणाले.

असे झाला नियमांमध्ये बदल

या आधी तामिळनाडूमध्ये प्रसूती रजा ही 90 दिवसांची होती. पण 2011 मध्ये यात बदल करून ती 6 महिने करण्यात आली. 2016 मध्ये ही मुदत पुन्हा तीन महिन्यांनी वाढवून ती 9 महिने करण्यात आली. त्यानंतर, जुलै 2021 मध्ये, तत्कालीन द्रमुक सरकारने ती एका वर्षाची (365 दिवस) केली होती. पण ती फक्त दोनपेक्षा कमी मुले असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना लागू होती. तर दोन किंवा त्याहून अधिक मुले असलेल्या महिलांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 84 दिवस रजा मिळत होती. पण आता सरकारच्या या नवीन निर्णयामुळे तिसऱ्या अपत्यासाठीदेखील राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांना एका वर्षाची रजा मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT