

Tamil Nadu CM Vijay Gold Ring Scheme : तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी निवडणुकीपूर्वी महिला आणि बालकांसाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. २०२६ च्या विधानसभा निवडणुक प्रचारावेळी, राज्यात आपले सरकार आल्यास जन्मणाऱ्या प्रत्येक बाळाला 'मामा' या नात्याने सोन्याची अंगठी भेट देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री विजय यांनी दिले होते.
मुख्यमंत्री विजय यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीची 'थाईमामन थंगा मोथिराम योजना' (नवजात बालकांसाठी मामाकडून सोन्याची अंगठी) लवकरच अंमलात येणार आहे. सरकारने त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बाळाला सोन्याची अंगठी दिली जाणार आहे.
तमिळ चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार जोसेफ थलापती विजय यांनी 2026 च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. थलपती विजय यांनी अवघ्या दोन वर्षांत आपल्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचवलं. ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले असून विजय यांनी स्वतःला राज्यातील मुलांचा 'मामा' म्हणून संबोधले आहे.
तमिळ संस्कृतीत मामाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. कुटुंबात नवीन बाळ जन्माला आल्याच्या आनंदात दिल्या जाणाऱ्या 'थैमामन सीर' (मामाची भेट) या सांस्कृतिक परंपरेनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. या परंपरेनुसार नवजात बालकाचे स्वागत केले जाते आणि कुटुंबाला आशीर्वाद दिला जातो. याच परंपरेचा आधार घेत ही योजना आखण्यात आली आहे. या योजनेची तामिळनाडूमध्येच नव्हे तर महाराष्ट्रासह देशभरात चर्चा सुरु आहे.
दरम्यान, या योजनेच्या अंमल बजावणीसाठी सरकारने वार्षिक ७५५.८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 'तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन'ने (टीएनएमएससी) अंगठ्यांच्या खरेदीसाठी निविदा काढल्या आहेत. निविदेनुसार, २२ कॅरेट सोन्याच्या सुमारे ४.४१ लाख अंगठ्या पुरविण्यासाठी नामांकित सराफांकडून अर्ज मागविले आहेत.
अंगठीसाठी प्रति ग्रॅम १३ हजार रुपये रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. अंगठीची रचना करताना ती नवजात बालकाला टोचणार नाही किंवा इजा होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सरकारच्या सूचना आहेत. राज्यातील ३८ जिल्ह्यांमधील १०७ शासकीय रुग्णालयांमध्ये या अंगठ्यांचा पुरवठा केला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.