Annamalai, Narendra Modi Sarkarnama
देश

BJP Tamil Nadu Election: भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर पहिल्यांदा अन् स्पष्टच बोलले अन्नामलाई; म्हणाले,'मी कुठूनही निवडणूक लढवू शकतो,पण...'

Tamil Nadu Assembly Election 2026: मागील विधानसभा निवडणुकीवेळी के. अन्नामलाई यांच्या सांगण्यावरूनच भाजपने अण्णाद्रमुकसोबतची युती तोडल्याची चर्चा होती. पण त्याच निवडणुकीत पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Deepak Kulkarni

Tamilnadu News: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपली 27 उमेदवारांची यादी शुक्रवारी(ता.4 एप्रिल) जाहीर केली. यावेळी भाजपनं सर्वात धक्कादायक निर्णय घेतानाच माजी प्रदेशाध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अत्यंत जवळचे समजल्या जाणाऱ्या के.अन्नामलाई यांनाच उमेदवारी नाकारल्याचं समोर आलं होतं. ते गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच तिकीट कापल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. पण आता उमेदवारी नाकारल्यानंतर के.अन्नामलाई यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

भाजपाने राज्यातील आपले युवा नेते अन्नामलाई यांना तमिळनाडूमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न दिल्यानं मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. तसेच भाजपाने अन्नामलाई यांना उमेदवारी का नाकारली असावी, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. त्यावर आता खुद्द अन्नामलाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अन्नामलाई यांनी आपण तमिळनाडूत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हा निवडणूक न लढवण्याचा निर्णय स्वत: घेतल्याचंही त्यांनी म्हटलं असून पक्षाच्या कोअर कमिटीला आपण याबाबत पत्र लिहून आधीच निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं होतं, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

तिकीट कापल्यावरुन विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर करताना के.अन्नामलाई म्हणाले, मीच निवडणूक लढवू इच्छित नव्हतो, तर पक्ष मला उमेदवारी देईल कशी? जर मीच स्वत:ला मर्यादित ठेवू इच्छित असेन, तर गोष्ट वेगळी होती. अन्यथा मी कुठूनही निवडणूक लढवू शकतो. विशेष म्हणजे यावेळी अन्नामलाई यांनी आपल्याला पक्षाकडून सन्मान दिल्याबद्दल भाजपचे आभारही मानले. यावेळी अन्नामलाई यांनी पूर्ण ताकदीनिशी एनडीएच्या उमेदवारांचा प्रचार करेन, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तसेच देशातील सत्ताधारी पण तामिळनाडूमध्ये किरकोळ अस्तित्व असलेल्या भाजपाने यावेळची विधानसभेची निवडणूक एनडीएतील मित्रपक्षांसोबत मिळून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीएमधील जागावाटपात भाजपाच्या वाट्याला केवळ 27 जागा आल्या आहेत.

के. अन्नामलाई भाजपचे आक्रमक युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. तामिळनाडूत भाजप रुजवण्यात त्यांचा योगदान मोठं आहे. भाजपनं काही महिन्यांपूर्वीच अन्नामलाई यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं होतं. भाजप आणि अद्रमुक यांची युती अन् जागा वाटपावर अन्नामलाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्रही लिहिलं आहे.

मागील विधानसभा निवडणुकीवेळी के. अन्नामलाई यांच्या सांगण्यावरूनच भाजपने अण्णाद्रमुकसोबतची युती तोडल्याची चर्चा होती. पण त्याच निवडणुकीत पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. तमिळनाडूत काही महिन्यांपूर्वी भाजपनं पुन्हा अण्णाद्रमुकशी युती केली. त्यानंतर अन्नामलाई यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT