Tamilnadu News: तमिळनाडू भाजपचा एक प्रमुख चेहरा असलेले व माजी प्रदेशाध्यक्ष, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अत्यंत जवळचे समजले जाणाऱ्या के.अन्नामलाई यांनाच पक्षाने मोठा झटका दिला आहे. काही महिन्यांपासून ते पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच भाजपने आगामी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली आहे. हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं घेतलेला हा निर्णय धक्कादायक मानला जात आहे.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपल्या 27 उमेदवारांची यादी शुक्रवारी(ता.3 एप्रिल) जाहीर केली आहे. या यादीत भाजपानं पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना संधी दिल्याचं दिसून येत आहे. मात्र,याचवेळी भाजपनं आपला तमिळनाडूमधला हुकमी पत्ता असलेल्या के. अन्नामलाई यांचंच तिकीट कापण्यात आल्याचं समोर येत आहे. भाजपच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
के. अन्नामलाई भाजपचे आक्रमक युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. तामिळनाडूत भाजप रुजवण्यात त्यांचा योगदान मोठं आहे. भाजपनं काही महिन्यांपूर्वीच अन्नामलाई यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं होतं. भाजप आणि अद्रमुक यांची युती अन् जागा वाटपावर अन्नामलाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्रही लिहिलं आहे.
मागील विधानसभा निवडणुकीवेळी के. अन्नामलाई यांच्या सांगण्यावरूनच भाजपने अण्णाद्रमुकसोबतची युती तोडल्याची चर्चा होती. पण त्याच निवडणुकीत पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. तमिळनाडूत काही महिन्यांपूर्वी भाजपनं पुन्हा अण्णाद्रमुकशी युती केली. त्यानंतर अन्नामलाई यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
तमिळनाडूत एनडीएनं विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाला अंतिम रुप दिलं आहे. यामध्ये 234 जागांपैकी अद्रमुकला 169 जागा तर भाजप केवळ 27 जागा लढणार आहे. त्याचबरोबर इतर सहकारी पक्षांनाही जागा सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये PMK च्या वाट्याला 18 आणि AMMK या पक्षाच्या वाट्याला 11 जागा आल्या आहेत.
अन्नामलाई यांनी भाजप आणि अद्रमुक यांच्या युतीमध्ये जागा वाटपावर नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात त्यांनी दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्रही लिहित गंभीर आरोपही केला होता. अन्नामलाई यांनी भाजपला विजयाच्या दृष्टीनं सोप्या असलेल्या जागा अण्णा द्रमुकनं स्वतः जवळ ठेवल्या असून जिंकण्यास अवघड जातील अशा जागा भाजपला दिल्या आहेत, असा अन्नामलाई यांचा दावा आहे.
अण्णा द्रमुकचे नेते के. पलानीस्वामी यांनी ही माहिती दिली आहे. तामिळनाडूत 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी तामिळनाडूत प्रमुख लढत ही द्रमुक आघाडी विरुद्ध अद्रमुक, भाजप आणि इतर स्थानिक पक्ष यांच्यामध्ये होणार आहे.
मात्र तमिळनाडूत भाजपाने एआयएडीएमकेसोबत केलेली आघाडी आणि अन्नामलाई यांचे एआयएडीएमकेशी असलेले कटू संबंध यामुळे अन्नामलाई यांना भाजपाने निवडणुकीच्या रिंगणापासून दूर ठेवले, असे बोलले जात आहे.
भाजपाने प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांच्यापासून ते माजी राज्यपाल सुंदरराजन यांपर्यंत अनेक ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्यात एल. मुरुगन यांना अविनासी मतदारसंघ, तसेच तेलंगणाच्या माजी राज्यपाल तिमिलासाई सुंदरराजन यांना मायलापूरमतदारसंघातून भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.