Tamil Nadu Government Free Laptop Scheme; CM Vijay Sarkarnama
देश

Free Laptop Scheme : CM विजय यांची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा! तमिळनाडू सरकार देणार मोफत लॅपटॉप; तब्बल 2 हजार कोटी मंजूर

Tamil Nadu CM Vijay Government Free Laptop Scheme for College Students : तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना दोन मोठ्या योजना सुरू केल्या आहेत. तर आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी देखील निर्णय घेतला आहे.

Aslam Shanedivan

Tamil Nadu Student Digital Education Scheme News : तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. नवजात बालकांना प्रत्येकी एक ग्रॅम सोन्याची अंगठी देणारी 'थाईमामन थंगा मोथिरम थिट्टम' योजना सुरू केल्यानंतर, आता पात्र नववधूंना आठ ग्रॅम सोन्याचे नाणे आणि रेशमी साडी भेट देणाऱ्या 'अण्णन सीर' योजनेलाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी सरकारने तब्बल २ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

नवजात बालकांना एक ग्रॅम सोन्याची अंगठी

तमिळनाडू सरकारने नवजात बालकांसाठी 'थाईमामन थंगा मोथिरम थिट्टम' म्हणजेच 'मामाकडून सोन्याची अंगठी' ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या पात्र बालकांना प्रत्येकी एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी दिली जात आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी २८ सप्टेंबर २०२६ रोजी मदुराई येथील सरकारी राजाजी रुग्णालयात या योजनेचा शुभारंभ केला. सरकारी रुग्णालयांमधील प्रसूतीला प्रोत्साहन देणे आणि माता-बालकांचे महत्त्व अधोरेखित करणे हा या योजनेमागील उद्देश आहे.

नववधूंना आठ ग्रॅम सोन्याचे नाणे आणि रेशमी साडी

यानंतर तमिळनाडू सरकारने 'अण्णन सीर' म्हणजेच 'मोठ्या भावाकडून भेट' ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत पात्र नववधूंना लग्नाच्या वेळी आठ ग्रॅम वजनाचे २२ कॅरेट सोन्याचे नाणे आणि एक रेशमी साडी भेट दिली जाणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने २०२६-२७ च्या सुधारित अर्थसंकल्पात सुरुवातीची ८१२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तमिळनाडूमधील पात्र कुटुंबांना विवाहाच्या वेळी आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे.

आता कॉलेज विद्यार्थ्यांनाही मोफत लॅपटॉप

महिला आणि नवजात बालकांसाठी योजनांची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री विजय यांनी आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही मोठी घोषणा केली आहे. 'वेत्री लॅपटॉप योजना' या नावाने ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी २ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ७ नोव्हेंबर रोजी सरकारने तिच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय मंजुरी आणि पात्रतेचे निकष जाहीर केले.

या योजनेंतर्गत सरकारी आणि सरकारच्या अनुदानित महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जाणार आहेत. याशिवाय पॉलिटेक्निक आणि आयटीआयमधील पात्र विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. कला, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, पशुवैद्यकीय, कृषी, मत्स्यव्यवसाय आणि कायदा अशा विविध शाखांतील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.

तसेच २०२५-२६ मध्ये यापूर्वीच्या लॅपटॉप वितरण योजनेचा लाभ न मिळालेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांनाही या योजनेत संधी देण्यात येणार आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या गरजेनुसार इंटेल कोअर आय५ किंवा त्याच्या समकक्ष प्रोसेसर असलेले लॅपटॉप देण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री विजय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती

लॅपटॉप योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. लॅपटॉप खरेदीची जबाबदारी तमिळनाडू इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनकडे (ELCOT) देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण, तांत्रिक कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींसाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

एकीकडे नवजात बालकांना सोन्याची अंगठी, नववधूंना सोन्याचे नाणे आणि रेशमी साडी, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप अशा विविध योजनांच्या माध्यमातून मुख्यमंत्री विजय सरकारने निवडणुकीतील आश्वासनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात आणि कल्याणकारी योजनांमध्ये या निर्णयांची विशेष चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT