बिहारमध्ये सध्या तेजप्रताप यादव यांच्या राजकीय वाटचालीवरून तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यांची राष्ट्रीय जनता दलातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच लालूप्रसाद यादव यांनी त्यांना कुटुंबातूनही बेदखल केले आहे. त्यानंतर तेजप्रताप यांनी पहिल्यांदाच याबाबत सोशल मीडियात उघडपणे भाष्य करत राजकीय धुराळा उडवून दिला आहे.
तेजप्रताप यांनी रविवारी पहाटेच सोशल मीडियात एक पोस्ट करत वडील लालूप्रसाद यादव आणि आई राबडीदेवी यांना भावनिक साद घातली होती. तुमच्या दोघांमध्येच आपले जग सामावले असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते. त्यानंतर त्यांनी दुपारी लहान बंधू व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना उद्देश एक पोस्ट केली आहे.
तेजस्वी यादव यांना या माध्यमातून तेजप्रताप यांनी सतर्क केल्याचे मानले जात आहे. तसेच त्यांनी विरोधकांनाही सूचक इशारा दिला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझ्या अर्जुनापासून मला वेगळे करण्याची स्वप्न पाहणाऱ्यांनो, तुमचे षडयंत्र कधीच यशस्वी होणार नाही. तुम्ही कृष्णाचे सैन्य नेऊ शकता, पण कृष्णाला नाही.
मी लवकरच प्रत्येक षडयंत्राचा पर्दाफाश करणार असल्याचेही तेजप्रताप यांनी म्हटले आहे. बंधू तेजस्वी यांना उद्देशून त्यांनी लिहिले आहे की, माझ्यावर विश्वास ठेव, मी कोणत्याही परिस्थितीत तुझ्यासोबत आहे. सध्या मी दूर आहे पण माझा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत होता आणि राहील. आई-वडिलांकडे लक्ष दे, जयचंद सगळीकडे आहेत, आतही आणि बाहेरही, असे तेजप्रताप यांनी म्हटले आहे.
तेजप्रताप यांनी पहाटे 5 वाजून 27 मिनिटांनी केलेल्या पोस्टची सुरूवात माझे प्रिय आई-वडील, अशी केली आहे. पुढे ते म्हणतात की, तुम्हा दोघांमध्येच माझे संपूर्ण जग सामावले आहे. देवापेक्षाही तुम्ही आणि तुमचा आदेश माझ्यासाठी मोठा आहे. तुम्ही आहे म्हणूनच माझ्याकडे सगळं काही आहे. मला फक्त तुमचा विश्वास आणि प्रेम हवे आहे, इतर काहीच नको.
पप्पा, तुम्ही नसता तर हा पक्षही नसता आणि माझ्यासोबत राजकारण करणारे काही जयचंदसारखे लालची लोकही नसते, असेही तेजप्रताप यांनी म्हटले आहे. त्यांनी जयचंद असा उल्लेख नेमका कुणाचा केला, यावरून चर्चांना उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.