Karnataka Congress News: सिद्धरामय्या हे कर्नाटकातील काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत. सिद्धरामय्या हे देखील कुरुबा समाजातून (ओबीसी) येतात. ते राज्यातील सर्वात मोठे ओबीसी नेते मानले जातात. अशा परिस्थितीत 2024 च्या निवडणुकीत ओबीसी मते आपल्या बाजूने जिंकण्यासाठी काँग्रेसकडे सिद्धरामय्या यांच्यापेक्षा चांगला चेहरा नव्हता. त्यामुळे ते राज्यातील सामाजिक न्यायाचा चेहरा म्हणून उदयास आले.
ओबीसीसह इतर समाजातही मोठा जनाधार...
सिद्धरामय्या (Siddaramaiah) जरी कुरुबा समाजातून (ओबीसी) आले असले तरी त्यांचा दलित,अल्पसंख्याक आणि आदिवासी समाजातही त्यांचा मोठा पगडा आहे. 2013 ते 2018 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गरिबांसाठी अनेक योजना राबवल्या. त्यामुळे प्रत्येक समाजात त्यांची आपला नेता ओळख निर्माण झाली.
प्रशासनावर मजबूत पकड
सिद्धरामय्या यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत 12 निवडणुका लढवल्या, त्यापैकी 9 जिंकल्या. सिद्धरामय्या 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. यापूर्वी ते 1994 मध्ये जनता दल सरकारमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री होते. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांची प्रशासनावरील पकड मजबूत राहिली. (Karnataka Assembly Election)
भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही...
कर्नाटकच्या प्रत्येक निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा कायमच कळीचा मुद्दा राहिला आहे. याचमुळे अनेक नेत्यांना मुख्यमंत्री, मंत्रिपद गमवावी लागली. काहींना तुरुंगातही जावे लागले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनाही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात जावे लागले होते. बोम्मई सरकारवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. पण सिद्धरामय्या हे असे नेते आहेत जे दीर्घकाळ राजकारणात आहेत आणि त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही ही एक हीच जमेची बाजू ठरली.
...म्हणून काँग्रेसने सिद्धरामय्या यांच्यावर डाव
काँग्रेसने (Congress) निवडणुकीपूर्वी कर्नाटकच्या जनतेला 5 आश्वासने दिली होती. आता राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. अशा स्थितीत या योजना पूर्ण करणे हे काँग्रेसपुढे मोठे आव्हान आहे. त्यामुळे आधीच अनुभव असलेला मुख्यमंत्री निवडण्यावर काँग्रेसचे लक्ष होते. सिद्धरामय्या हे एकदा मुख्यमंत्री राहिले आहेत, अशा स्थितीत काँग्रेसने सिद्धरामय्या यांच्यावर डाव खेळला.
८५ आमदारांचा पाठिंबा
काँग्रेस लोकशाहीच्या तत्वानुसार मुख्यमंत्री निवडते, असे सिद्धरमय्या यांनी यापूर्वीच सांगितले होते. त्यानुसार निवडणुकीनंतर आमदारांची मते जाणून घेण्यासाठी काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांच्यासह तीन निरीक्षकांची नियक्ती केली होती. त्यात १३५ पैकी ८५ आमदारांनी सिद्धरमय्यांच्या बाजूने कौल दिल्याची माहिती आहे. त्यामुळेच त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडल्याचे बोलले जात आहे.
शिवकुमारांवर कारवाईचे सावट
कर्नाटकमध्ये काँग्रेसने भ्रष्टाचाराचा मुद्द्यावरून भाजपला (BJP) घेरले. आता देशात २०२४ मध्ये लोकसभा होत आहे. दरम्यान, डी. के. शिवकुमार (D.K. Shivakumar) यांच्यावर आयकर आणि अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई सुरू आहे. या प्रकरणांचा भाजप आक्रमकपणे पाठपुरवा करेल. त्याचा फटका लोकसभेला बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, डी.के. शिवकुमार यांच्या कथित बेकायदेशीर संपत्तीच्या चौकशीला अंतरिम स्थगिती असली तरी कारवाईचे सावट कायम आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.