mamata banerjee sarkarnama
देश

बंडखोरांना मोठा झटका, घरवापसी सुरू! आमदार परतला ममता बॅनर्जींकडे...

Rebel MLA returns to TMC Mamata Banerjee : बंडखोरी केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत बड्या आमदाराची ममता बॅनर्जींच्या TMC मध्ये घरवापसी झाली. जाणून घ्या टीएमसीत परतण्यामागचं खरं कारण काय?

Rashmi Mane

पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाला आता वेगळे वळण मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षात निर्माण झालेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर अमडांगा मतदारसंघाचे TMC आमदार 'पीरजादा' कासिम सिद्दीकी यांनी पुन्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. बंडखोर नेते ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटापासून आपण दूर होत असल्याचे स्पष्ट करत सिद्दीकी यांनी 'घरवापसी'चा निर्णय जाहीर केला.

कासिम सिद्दीकी हे बंडखोर गटात सहभागी झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यांत त्यांच्या भूमिकेत मोठा बदल झाला आहे. आपली दिशाभूल करून काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. बंडखोर गटही ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याचे आपल्याला सांगण्यात आले होते. मात्र, नंतर त्या गटात ममता बॅनर्जींचा कोणताही उल्लेख नसल्याचे लक्षात आल्याचे सिद्दीकी यांनी सांगितले.

ममता बॅनर्जी यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगताना कासिम सिद्दीकी म्हणाले, "आम्हाला सही करायला सांगितले होते, आणि ती सही दीदीकडे जाणार होती. आम्हाला सांगण्यात आले होते की आम्ही एकत्र राहू. जोपर्यंत आम्ही दीदीसोबत असतो, तोपर्यंत आम्ही एकत्रच राहू. जेव्हा आम्ही तिच्याकडे जातो, तेव्हा दीदीच्या मनात कोणताही नकारात्मक विचार येत नाही; ती आमच्यासाठी सर्वस्व आहे."

तसेच आपल्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देत त्यांनी म्हटले, "आम्ही दीदींना ओळखतो. दीदींनीच आम्हाला निवडणुकीच्या मैदानात पाठवले आणि आम्ही दीदींचा फोटो दाखवून मतं मागितली. दीदींना पाहून लोकांनी आम्हालाही मतदान केले. आम्ही दीदींसोबत आहोत आणि जोपर्यंत आम्ही आहोत, तोपर्यंत त्यांच्यासोबतच राहू."

कासिम सिद्दीकी यांचा संबंध हुगळी जिल्ह्यातील प्रसिद्ध फुरफुरा शरीफ परिवाराशी आहे. मुस्लिम समाजातील त्यांचा प्रभाव आणि सामाजिक संपर्क लक्षात घेऊन ममता बॅनर्जी यांनी त्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये महत्त्वाची जबाबदारी दिली होती. पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांची प्रदेश महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील अमडांगा विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते आमदार म्हणून निवडून आले.

दरम्यान, TMC मधील बंडखोरीचा मुद्दा केवळ आमदारांपुरता मर्यादित राहिलेला नाही. पक्षाच्या 20 बंडखोर खासदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाला होत असलेल्या विलंबाविरोधात तृणमूल काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयाला होणाऱ्या विलंबाला आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने मंगळवारी सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT