TMC Rebel MPs : तृणमूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांनी रविवारी नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) या पक्षात विलीन होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर या पक्षाबाबत देशभरात उत्सुकता वाढली आहे. पश्चिम बंगालमध्ये नोंदणी झालेल्या या पक्षाने बंगालमध्ये एकही निवडणूक लढलेली नाही. त्यामुळे बंडखोर खासदारांच्या निर्णयावरून चर्चांना उधाण आले आहेत. त्यातच आता या पक्षातही वादाची ठिणगी पडली आहे.
NCPI चे संस्थापक सदस्य शंतनू डे यांनी या विलीनीकरणावरच आक्षेप घेतला आहे. आपल्याला कोणतीही माहिती न देता हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये मी, माझा मित्र आणि काही राजकारणी आणि अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येत देशातील जनतेच्या मानवी हक्कांबाबत काम करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत २०२२ मध्ये बैठक झाली होती.
आम्ही त्याची सुरूवात त्रिपुरातून केली. तिथे लोकांशी संवाद साधण्यास सुरूवात केली. २०२३ मध्ये आम्ही पक्षाची नोंदणी केली. मला सोशल मीडिया आणि इतर राजकारण्यांच्या माध्यमातून विलीनीकरणाची माहिती समजली. हा पक्ष केवळ एका व्यक्तीशी संबंधित नाही. खूप सदस्य आहेत. मी पक्षाचे चिन्ह निवडले. पक्षाचा झेंडा तयार केला. मी पक्षाची घटना लिहिली. सर्व काही मी केले, असे डे यांनी सांगितले.
पक्षाचा अध्यक्ष बनलेल्या व्यक्तीने माझ्याशी, अन्य सहकाऱ्यांशी न बोलता, लीगल सेलचा सल्ला न घेता, प्रवक्त्यांशी न बोलता हा निर्णय घेतला असल्याची नाराजी डे यांनी व्यक्त केली. पक्षाच्या अन्य काही पदाधिकाऱ्यांकडून याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे २० बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणावरून आता वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, NCPI या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष अशी नोंद आहे. या पक्षाची नोंदणी २० जानेवारी २०२३ रोजी झाली आहे. पक्षाची बंगालमध्ये नोंदणी झाली असली तरी त्रिपुरातून पहिली निवडणूक लढविली होती. आयोगाकडील माहितीनुसार, पक्षाला आतापर्यंत १ लाख १३ हजार रुपये देणगी मिळाली आहे. नोंदणीनुसार, श्वेली कुंडू या पक्षाच्या खजीनदार आहेत. उतिया कुंडू हे त्यांचे पती असून ते पक्षाचे अध्यक्ष आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.