Tamil Nadu Political News : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्या राजकीय प्रवेशाबाबत तामिळनाडूमध्ये चर्चांना वेग आला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासोबत तिच्या उपस्थितीवरून यापूर्वीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. आता तिरुनेलवेली येथे तिच्या कथित समर्थकांनी ‘यंग रिव्होल्युशनरी लीडर त्रिशा फोरम’ (Young Revolutionary Leader Trisha Forum) नावाचा नवा मंच स्थापन केल्याने तिच्या राजकीय पदार्पणाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.
सोमवारी (२३ नोव्हेंबर) तिरुनेलवेली येथे या मंचाची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मंचाच्या वतीने जारी करण्यात आलेले पोस्टरही चर्चेचा विषय ठरले आहे. या पोस्टरमध्ये त्रिशा कृष्णन हिरव्या रंगाची साडी नेसून हात जोडलेल्या अवस्थेत दिसत आहे. मंचाच्या लोगोमध्येही हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. तामिळनाडूच्या राजकारणात हिरवा रंग दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या नेतृत्वाखालील एआयएडीएमके (AIADMK) पक्षाशी जोडला जात असल्याने पोस्टरमधील रंगसंगतीकडेही राजकीय संकेत म्हणून पाहिले जात आहे.
त्रिशाला दिली ‘इलैया पुराची थलैवी’ उपाधी
या नव्या मंचाच्या समर्थकांनी त्रिशा कृष्णनला ‘इलैया पुराची थलैवी’ अर्थात युवा क्रांतिकारी नेत्या अशी उपाधी दिली आहे. दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांना तामिळनाडूमध्ये ‘पुराची थलैवी’ म्हणून ओळखले जात होते. त्याच धर्तीवर त्रिशाला ही उपाधी देत समर्थकांनी तिची तुलना जयललिता यांच्याशी केली आहे. काही समर्थकांनी तर त्रिशाला जयललितांची संभाव्य राजकीय उत्तराधिकारी म्हणूनही संबोधले आहे.
त्रिशा कृष्णनने राजकारणात प्रवेश करून या मंचाशी जोडले जावे, अशी अपेक्षा असल्याचे समर्थकांनी सांगितले. जनतेच्या हक्कांसाठी काम करणे हा मंचाचा प्रमुख उद्देश असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राजकीय पदे किंवा सत्तेची अपेक्षा ठेवून संघटना स्थापन करण्यात आली नसून, तामिळनाडूमधील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याचा हेतू असल्याचेही समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्रिशा कृष्णनने अद्याप राजकारणात प्रवेश करण्याबाबत किंवा या मंचाशी संबंधित असल्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
मुख्यमंत्री विजयसोबत उपस्थितीमुळे चर्चांना उधाण
अभिनेत्री त्रिशा कृष्णन आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या विविध कार्यक्रमांतील उपस्थितीवरून यापूर्वीही राजकीय चर्चांना उधाण आले होते. निवडणूक प्रचाराच्या काळापासून काही सार्वजनिक तसेच खासगी कार्यक्रमांमध्ये दोघे एकत्र दिसल्याचे वृत्त समोर आले आहे. अलीकडेच वाय. एस. अनिल रेड्डी यांच्या मुलगी श्रेया आणि उज्ज्वल यांच्या विवाह रिसेप्शनमध्येही दोघे उपस्थित असल्याची चर्चा झाली.
याशिवाय, ब्रिटनमध्ये अभिनेता अजित कुमार सहभागी असलेल्या रेसिंग इव्हेंटदरम्यानही त्रिशा आणि विजय एकत्र दिसल्याचे सांगितले जात आहे. स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय कार्यक्रमात त्रिशा पहिल्या रांगेत बसलेली दिसल्याने तिच्या उपस्थितीवरून विरोधकांनीही प्रश्न उपस्थित केले होते. या घटनांमुळे विजय आणि त्रिशा यांच्या सार्वजनिक उपस्थितीला राजकीय चर्चांचे स्वरूप मिळाले.
उदयनिधी स्टॅलिन यांच्या टिप्पणीवरूनही वाद
त्रिशा कृष्णन आणि मुख्यमंत्री विजय यांच्या संबंधांवरून यापूर्वी तामिळनाडूतील राजकीय वातावरण तापले होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी या विषयावर केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीमुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांच्या अटकेची आणि जामिनावर सुटकेची चर्चा झाली होती.
या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजय यांनी सप्टेंबरमध्ये कोणाचेही नाव न घेता राजकीय टीका करताना महिलांविरोधात अपमानास्पद टिप्पणी करू नये, असा इशारा दिला होता. आता त्रिशा कृष्णनच्या नावाने नव्या मंचाची स्थापना झाल्याने तिच्या राजकीय प्रवेशाबाबतच्या चर्चांना पुन्हा चालना मिळाली आहे. मात्र, समर्थकांनी संघटना स्थापन केली असली तरी अभिनेत्री स्वतः राजकीय मैदानात उतरणार का, याबाबत अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.