TVK alliance politics : तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर काँग्रेसने डीएमकेशी (DMK) असलेली आघाडी तोडत तमिळगा वेट्री कळघम पक्षाला (TVK) पाठिंबा दिला. सत्तास्थापनेसाठी धडपडणाऱ्या सुपरस्टार विजय यांच्या मदतीला धावून गेलेला काँग्रेस पहिला पक्ष होता. काँग्रेसच्या या मदतीची परतफेड मुख्यमंत्री विजय यांनी काही दिवसांतच केली आहे.
राज्यात काँग्रेसचे पाच आमदार निवडून आले आहेत. मुख्यमंत्री विजय यांच्या मंत्रिमंडळातही काँग्रेसला स्थान मिळाले आहे. त्यानंतर आता विजय यांनी राज्यसभेची एक रिक्त जागाही काँग्रेसला देण्याची घोषणा केली आहे. टीव्हीकेकडून बुधवारी तशी अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे संसदेतील काँग्रेसची ताकद वाढणार आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मंगळवारी विजय यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी टीव्हीकेकडून काँग्रेसला ही जागा सोडण्यात आली. या निर्णयामुळे टीव्हीके आणि काँग्रेसची आघाडी आणि राज्यातील काँग्रेसची स्थितीही अधिक मजबूत झाली आहे. राज्यात डीएमकेसोबत आघाडी असताना काँग्रेसला राज्यसभेची एक जागा मिळाली होती.
एआयडीएमकेचे नेते सी. व्ही. षण्मुगम हे विधानसभेत निवडून गेल्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या रिक्त जागेसाठी निवडणूक होत आहे. येत्या १८ जूनला ही निवडणूक होणार आहे. २०२८ पर्यंत या जागेचा कार्यकाळ असणार आहे. विशेष म्हणजे षण्मुगन यांच्या गटाने टीव्हीके सरकारला पाठिंबा दिला आहे.
राज्यात टीव्हीके सरकारकडे मजबुत बहुमत आहे. त्यामुळे काँग्रेसचा राज्यसभेचा उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. टीव्हीकेच्या घोषणेवर अद्याप इतर मित्रपक्षांची प्रतिक्रिया आली नाही. मात्र, विजय यांच्याकडे असलेले बहुमत पाहता त्याला कुणीही विरोध करणार नाही, असे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.