Ravi Rana, Narendra Modi, Uddhav Thackeray Sarkarnama
देश

Ravi Rana : रवी राणांचा उद्धव ठाकरेंबाबत खळबळजनक दावा; म्हणाले, मोदींची माफी मागून...

सरकारनामा ब्यूरो

New Delhi Political News :

अमरावती जिल्ह्यातील बडनेरचे अपक्ष आमदार रवी राणा कायम वेगवेगळे दावे आणि आरोप करत असतात. आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवतात. आज दिल्लीतही त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यावेळी एक खळबळजनक दावाही केला आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आलेल्या रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंसंदर्भात अत्यंत महत्त्वाचा दावा केला आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीअगोदर उद्धव ठाकरे भाजपसोबत येतील, असा खळबळजनक दावा रवी राणा यांनी केला आहे. उद्धव ठाकरे सध्या बेचैन असून मोदींशिवाय पर्याय नाही, याची त्यांना जाणीव झाली आहे. त्यामुळे ते भाजपसोबत असा दावा राणांनी केला आहे. उद्धव ठाकरे कायम अहंकारात असतात. त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे. मात्र, आता मातोश्रीवर चिंतन सुरू आहे आणि त्यात मोदींशिवाय पर्याय नाही, या निर्णयावर ते आल्याचे कळते, असा दावा रवी राणा यांनी केला आहे. तसेच ते मोदींची माफी मागतील, असेही वक्तव्य रवी राणा यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे मोदींच्या सोबत येण्याचा प्रयत्न करत असून ते मोदींचे नेतृत्व स्वीकारतील, असा दावा रवी राणा यांनी केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीनं सरकार चालवत आहेत. तर उद्धव ठाकरेंनी अमरावतीतील शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्याचे काम केले. ज्या ठिकाणावरून उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल त्याच ठिकाणी पुतळा बसवला जाईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, अशा आव्हानाची भाषा रवी राणा यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संजय राऊत राज्यावरील विघ्न

संजय राऊत दिल्लीत आहेत. तरीही ते महाराष्ट्र सदनात शिवजयंतीला आले नाहीत. त्यांचे शिवाजी महाराजांबद्दल प्रेम बेगडी आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली. तसेच संजय राऊत दे राज्यावरील विघ्न आहेत, असा घणाघातही केला.

आठवडाभरात पुन्हा टीका

अशोक चव्हाण यांनी भाजपची वाट धरल्यानंतर रवी राणा यांनी अनेक काँग्रेस आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्याचवेळी ठाकरे गटातील अनेक आमदार भाजपमध्ये जातील आणि पक्षात केवळ उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत उरतील, असा टोला लगावला होता.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT