Loksabha Election : शिवसेनेतील बंडानंतर शिंदेंनाच काय भाजपच्या बड्याबड्या नेत्यांना तोंडावर बोलून ठाकरेंशी 'निष्ठा' राखण्याचा पवित्रा धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी ठेवला. ठाकरेंच्या या शिलेदाराला हरवण्यासाठी मंत्री, माजी मंत्री, सत्ताधाऱ्यांच्या बाकांवरच्या आमदारांनी धाराशिव पालथे घातले.
मात्र, सत्ताधीशांच्या बलाढ्य ताकदीपुढे निष्ठेच्या ताकदीच्या बळावर ओमदाराजेंना तब्बल 3 लाख 37 हजार 337 मतांच्या लीडपर्यंत नेले. म्हणजे, या लढतीत ओमराजेंना एकूण 7 लाख 28 हजार 491 मते मिळाल्याची नोंद आहे. ओमराजेंचे हे लीड म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लीडच्या दुपटीपेक्षाही अधिक आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास ठाकरेंचा हा निष्ठावंत मोदींपेक्षा अधिक लीडने जिंकला आहे.
महाराष्ट्रातील पहिलावहिला निकाल मंगळवारी दुपारीच जाहीर झाल्यात जमा होता. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ओमराजे Omraje Nimbalkar हे खासदार झाल्याचे पहिल्या फेरीतील आघाडीने दिसून आले होते. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चनाताई पाटलांचे पती राणजगजितसिंह पाटील हे आमदार असलेल्या तुळजापूर तालुक्यातील मतदारांनीही ओमराजेंच्या पारड्यात भरभरून दान टाकले.
प्रचंड आक्रमक प्रचार, ओमराजे, ठाकरेंना घालून पाडून बोलण्याच्या मंत्री, आमदारांच्या भाषेमुळे धाराशिवकरांनी एका झटक्यात सत्ताधाऱ्यांना म्हणजे, ओमराजेंच्या विरोधकांना जागा दाखवून दिली आहे. एवढ्या मंडळींशी सलग अडीच महिने दोन हात करणाऱ्या या संघर्षात भाजून निघालेले ओमराजे दुसऱ्यांदा खासदार झाले. निवडणूक जाहीर होण्याआधीच ओमराजेंच्या लीडची चर्चा धाराशिवमध्ये होती.
मात्र, राष्ट्रवादीच्या जोडीला भाजपची भलीमोठी यंत्रणा राहिल्याने ओमराजेंना नेमके किती मते मिळतील, हे बोलले जात होते. प्रत्यक्षात मात्र, लीडचे आकडे ऐकून धाराशिवमधील सर्वच विधानसभा मतदारसंघ, जिल्हा परिषदेचे गट, पंचायत समितीसाठीच्या महायुतीतील इच्छुकांना धडकी भरली असावी.
पालकमंत्री तानाजी सावंत Tanaji Sawant, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले. औशाचे आमदार अभिमन्यू पवार, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत., माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य अशी तगडी फौज ओमराजेंच्या विरोधात मैदानात उतरली होती.
या सर्व नेत्यांनी महायुतीतील अर्चनाताई पाटील यांच्या विजयासाठी लोकसभा मतदारसंघ पिंजू काढला होता. या सर्व नेत्यांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारल्याचे निकालानंतर समोर आले आहे. सत्ताधारी विरुद्ध जनता अशीच ही निवडणूक झाली. अर्चनाताई पाटील यांना 4 लाख 08 हजार 562 मते मिळाली आहेत.
महायुतीच्या यंत्रणेच्या तुलनेत ओमराजे यांची यंत्रणा अत्यंत तोकडी होती. ओमराजेंची आर्थिक बाजूही तुलनेने कमकुमत होती. अशा परिस्थितीत लोकांनी त्यांच्या बाजूने ही निवडणूक हातात घेतली होती. कार्यकर्ते आणि लोकांसोबतच्या वैयक्तिक संपर्काच्या बळावर ओमराजेंनी हे यश मिळवले आहे. सगळे दिग्गज एकीकडे आणि ओमराजे एकटे एकीकडे, असे चित्र निर्माण झाले होते.
एका आमदाराला पराभूत करण्यासाठी मोठ्या संख्येने दिग्गज एकवटल्याचे चित्र लोकांना आवडले नाही. त्यातच महायुतीच्या काही नेत्यांनी प्रचारात ओमराजेंबाबत वापरलेली भाषाही लोकांना आवडली नसल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. निष्ठेच्या बळावर उद्धव ठाकरे यांच्या या शिलेदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा दुप्पट मताधिक्य मिळवले आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.