NDA Loksabha Election Result : लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. यानुसार देशात पुन्हा एकदा एनडीए आघाडीने बहुमत मिळवलं आहे. तर राज्यात मात्र महायुतीला फटका बसला आहे. महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. मात्र देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचे दिसत आहे. या निकालावर प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, 'पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसर्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो !'
तसेच, 'इंडि आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या(BJP) वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले, या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.' असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
याचबरोबर 'उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते, तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मोदींना साथ दिली आहे.'
'संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू.'
'महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना(Shivsena), राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार आहेत, मी त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो !' असंही फडणीसांनी म्हटलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.