India Education News : देशातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत असून खासगी शाळांकडे पालकांचा वाढता कल असल्याचे UDISE 2025-26 च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
अहवालानुसार सरकारी शाळांमधून 27 लाखांहून अधिक विद्यार्थी कमी झाले, तर खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सुमारे 30 लाख विद्यार्थ्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. याचबरोबर इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते बारावीदरम्यान शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून आले आहे.
अहवालानुसार अनुसूचित जाती (SC) आणि इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांच्या (Student) प्रवेशसंख्येत गेल्या सहा वर्षांतील सर्वाधिक घट झाली आहे. शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ओबीसी, अनुसूचित जाती, अल्पसंख्याक, मुस्लिम तसेच इतर मागास घटकांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. अनुसूचित जमाती (ST) विद्यार्थ्यांच्या प्रवेशसंख्येत मात्र किरकोळ वाढ झाली आहे.
2025-26 मध्ये देशातील सरकारी शाळांची (School) संख्या 10,05,245 इतकी राहिली असून 2024-25 मध्ये ती 10,13,322 होती. म्हणजेच एका वर्षात 8,077 सरकारी शाळा बंद झाल्या. मागील वर्षी हा आकडा 4,338 होता. याउलट दोन वर्षांच्या कालावधीत खासगी शाळांची संख्या 10,581 ने वाढली आहे.
सरकारी शाळांबरोबरच इतर काही केंद्रीय सरकारी शाळांमधील प्रवेशसंख्येतही घट झाली असली, तरी केंद्रीय विद्यालय (KV) आणि जवाहर नवोदय विद्यालय (JNV) यांमधील प्रवेशसंख्या वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात मोठी पटसंख्या असलेल्या 9,269 सरकारी शाळा एकशिक्षकी असल्याची नोंद आहे. या शाळांमध्ये 1 लाख 79 हजार 104 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही शिक्षणतज्ज्ञांच्या मते, अनुदानित संस्थांच्या स्पर्धेमुळे आणि विविध स्थानिक कारणांमुळे सरकारी शाळांवरील दबाव वाढत आहे. या संदर्भातील दावे संबंधित घटकांकडून मांडले गेले असून त्याबाबत स्वतंत्र अधिकृत पडताळणी आवश्यक आहे.
अनुसूचित जाती (SC) विद्यार्थी : 4.38 कोटी (2024-25 : 4.39 कोटी)
इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थी : 11.09 कोटी (2024-25 : 11.16 कोटी)
अनुसूचित जमाती (ST) विद्यार्थ्यांच्या प्रवेशसंख्येत किरकोळ वाढ
अहवालानुसार शैक्षणिक गुणवत्तेतील आव्हाने, शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा अभाव आणि शिक्षकांवर वाढत असलेला अशैक्षणिक कामाचा ताण यामुळे सरकारी व अनुदानित शाळांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. परिणामी काही भागांमध्ये विद्यार्थ्यांचे शाळाबाह्य होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.