

Maharashtra SSC 2026 : राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात एकूण 94 हजार 544 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली.
तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात मंत्री भुसे यांनी सांगितले की, प्रथम भाषा म्हणून मराठी घेऊन राज्यभरातून 10 लाख 87 हजार 899 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 80 हजार 803 विद्यार्थी मराठी विषयात नापास झाले.
मराठी हा विषय द्वितीय किंवा तृतीय भाषा म्हणून घेऊन 4 लाख 13 हजार 917 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 13 हजार 741 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या दोन्ही गटांतील मिळून 94 हजार 544 विद्यार्थी (Student) मराठी विषयात नापास झाल्याची माहिती सरकारने सभागृहात दिली.
विधान परिषदेचे सदस्य किशोर दराडे, सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) आणि अंबादास दानवे यांनी राज्यातील केंद्रीय मंडळांच्या शाळांमध्ये मराठी विषयाच्या अध्यापनाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच, राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेत मराठी विषयाचा निकाल मागील पाच वर्षांतील नीचांकी 92.57 टक्के नोंदविला गेला आहे का, असा प्रश्नही विचारण्यात आला होता.
यावर उत्तर देताना मंत्री भुसे यांनी हा मुद्दा अंशतः खरा असल्याचे नमूद केले. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विभागीय शिक्षण उपसंचालकांवर सोपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी भाषेबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी आणि अध्ययनाला चालना मिळावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये महावाचन चळवळ, शाळांमध्ये मराठी विषय समूहांची स्थापना, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध उपक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन साहित्य उपलब्ध करून देण्याचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यासाठी मे-जून 2026 या कालावधीत इयत्ता पहिलीला शिकविणाऱ्या 80 हजार 925 शिक्षकांना बदललेल्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहितीही मंत्री भुसे यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.