Russia-Ukraine War Sarkarnama
देश

युक्रेनचा गनिमीकावा; रशियाला भटकवण्यासाठी उचललं मोठं पाऊल

रशियाने लष्करी सामर्थ्याच्या जोरावर युक्रेनमधील अनेक गावांवर कब्जा केला आहे.

सरकारनामा ब्युरो

कीव्ह : रशियाने लष्करी सामर्थ्याच्या जोरावर युक्रेनमधील (Russia-Ukraine War) अनेक गावांवर कब्जा केला आहे. अजूनही हे युध्द सुरूच असून युक्रेनने माघार घेईपर्यंत सुरूच राहील, असा इशारा दिला आहे. पण युक्रेनचं सैन्यही रशियाचा मुकाबला करत असून सर्वसामान्य नागरिकांनीही हातात शस्त्र घेतले आहे. आता रशियाला भटकवण्यासाठी युक्रेननं गनिमीकाव्या अवलंब करण्यास सुरूवात केली आहे.

दि स्टेट रोड एजन्सी ऑफ युक्रेननं (Ukravtodor) देशातील सर्व वाहतूक यंत्रणा, स्थानिक प्रशासनाला रस्त्यांवरील सर्व दिशादर्शक नावं, चिन्ह काढण्यास सांगितली आहेत. रशियन लष्कराला भूप्रदेशाबाबत माहिती नाही. त्यांच्याकडे युक्रेनमधील (Ukraine) रस्ते आणि इतर ठिकाणांची माहिती नाही, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना भटकवण्यासाठी रस्त्यांवरील सर्व फलक काढण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, रशियाने (Russia) पुकारलेल्या युध्दात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. तसेच रशियाला प्रत्युत्तर दिले जात असून आतापर्यंत त्यांची अनेक विमाने, रणगाडे उध्वस्त केल्याचेही युक्रेनकडून सांगितले जात आहे. इतर देशांनी युक्रेनची थेट मदत करण्यास नकार दिला आहे. पण रशियाच्या हल्ल्याचा या देशांनी निषेध केला आहे. यावरून युक्रेनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अमेरिकेची ऑफर धुडकावली

अमेरिकेने (America) युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना युक्रेनमधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी मदत करण्याची ऑफरही दिली होती. मात्र राष्ट्राध्यक्ष वोल्डोयोमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी स्पष्टपणे अमेरिकेची ही ऑफर नाकारली. आपल्याला पळून जाण्यासाठी पालखी नाही तर लढण्यासाठी शस्त्रे हवी आहेत. झेलेन्स्की यांनी राजधानी कीवमधून एक नवीन व्हिडिओ जारी करत आपण शेवटच्या श्वासापर्यंत युक्रेनमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे.

रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ले करत भयंकर विध्वंस केल्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्डोयोमीर झेलेन्स्की यांना कीवमधून बाहेर पडण्यास सांगितले. पण, त्यांनी साफ नकार दिला. असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टनुसार, या संकटसमयी झेलेन्स्की यांनी कीवमधून बाहेर पडण्याची ऑफर नाकारली, "इथे लढाई सुरु आहे, मला शस्त्रांस्त्रे हवी आहेत. पळून जाण्यासाठी मदत नको."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT