New Delhi News : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणानंतर जोरदार चर्चेत आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) बोर्डाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यातच गेल्या आठवड्यात यूपीएससीचे अध्यक्ष महेश सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या.
दरम्यान, रिक्त असलेल्या यूपीएससी बोर्डाच्या अध्यक्षपदी डॅशिंग महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी आयएएस अधिकारी प्रीती सूदन यांच्याकडे आता युपीएससी बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी 29 जुलैला ही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.
प्रीती सूदन या उद्या (गुरुवारी) 1 ऑगस्टला यूपीएससी आयोगाच्या अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी स्विकारणार आहेत. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ एप्रिल 2025 पर्यंत असणार आहे. प्रीती सूदन या 1983 सालच्या कर्नाटक केडरच्या आयएएस अधिकारी असून डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. केंद्र सरकारच्या विविध खात्यात महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले असून त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्वाच्या योजनां पूर्णत्वाकडे नेल्या आहेत. करोनाच्या काळात ऑक्टोबर 2017 ते जुलै 2020 या कोविड 19 च्या महामारीत सूदन यांनी रणनीतीकार म्हणून महत्वाची भूमिका बजावली आहे.
पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करताना आयएएस (IAS) अधिकारी पूजा खेडकर यांनी केलेल्या उद्योगांमुळे यूपीएससी बोर्ड देखील चर्चेत आले आहे. खेडकर प्रकरणामुळे यूपीएससी बोर्डावर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यूपीएससीच्या परीक्षांमध्ये खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे अधिकारी नियुक्त केले जात असतील तर सामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांनी कोणावर विश्वास ठेवून अशा परीक्षा द्याव्यात की नाही, असा प्रश्न विचारला जात होता.
सध्या पूजा खेडकर प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या वतीने केली जात असून यूपीएससीने वादग्रस्त पूजा खेडकर हिचे आयएएस पद तात्पुरते रद्द करण्याचा मोठा निर्णय बुधवारी दुपारी घेतला आहे.
यूपीएससीच्या (UPSC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेल्या प्रीती सूदन या चार वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झालेल्या आहेत. त्या हरियाना येथील रहिवाशी आहेत. आपल्या सेवेच्या कार्यकाळात त्यांनी केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये डॅशिंग कामगिरी केली आहे.केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण विकास मंत्रालयातही त्यांनी मोठी जबाबदारी निभावली आहे.
तसेच संरक्षण मंत्रालयाच्या सचिव, खाद्य व सार्वजनिक वितरण विभाग, आरोग्य विभागाच्या सचिवपदावर देखील त्यांनी काम केले आहे. यापूर्वी यूपीएससीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणारे महेश सोनी यांनी गेल्या आठवड्यात आपल्या व्यक्तिगत कारणाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त होते.
नव्याने यूपीएससीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेल्या प्रीती सूदन यांनी इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केली आहे. एमए, एमफील आणि पीएचडी त्यांनी अर्थशास्त्र विषयात केली आहे.बेटी बचाओ, बेटी पढाओ, आयुष्यमान भारत योजना यांसह राष्ट्रीय आरोग्य आयोग, एलाईड हेल्थ प्रोफेशनल आयोग आणि ई-सिगारेटवर प्रतिबंधक कायद्या बनविण्याचे श्रेय सूदन यांना जाते. सूदन यांना पदोन्नती देत युपीएससीच्या अध्यक्षपदी जबाबदारी देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.