Uttarakhand Bypolls Result 2024 Sarkarnama
देश

BJP Vs Congress : धर्मनगरी अयोध्येनंतर बद्रीनाथमध्येही भाजपचा पराभव, 'या' कारणांमुळे मतदारांची काँग्रेसला पसंती

Jagdish Patil

Uttarakhand Bypolls Result 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) अपेक्षित यश मिळालं नाही. देशात सत्ता स्थापन केली असली तरी भाजपचा स्वबळाचा नारा अपयशी ठरला. भाजपला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये सर्वात मोठा आणि जिव्हारी लागणारा पराभव हा अयोध्येत झाला.

कारण ज्या राम मंदिरांचा मुद्दा घेऊन भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्याच अयोध्येथील मतदारांनी भाजपला डावललं त्यामुळे विरोधकांनीही भाजपवर टीका केली. होती केवळ रामाच्या नावावर मतं मागणाऱ्या भाजपला लोकांनी जागा दाखवल्याचंही विरोधकांनी म्हटलं. अयोध्येतील पराभव भाजप विसरला नाही तोच आणखी एका धर्मनगरीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

उत्तराखंडमधील (Uttarakhand) विधानसभा पोटनिवडणुकीत लोकसभेप्रमाणे कल दिसून आला. येथील बद्रीनाथमध्ये काँग्रेस उमेदवाराने भाजप उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे अयोध्येनंतर बद्रीनाथमधील पोटनिवडणुकीचा निकाल भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. महत्वाची बाब म्हणजे याआधी बद्रीनाथ विधानसभेची जागा काँग्रेसकडे होती. परंतु काँग्रेस आमदार राजेंद्र भंडारी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपवासी झाल्यामुळे इथे पोटनिवडणूक झाली ज्यामध्ये भाजपचा पराभव झाला. मात्र हा पराभव का झाला याबाबतची काही कारणं समोर आली आहेत.

बद्रीनाथमधील भाजपच्या पराभवानंतर या ठिकाणी सुरु असलेल्या विकास कामांमुळे स्थानिक लोक आणि पुजारी नाराज झाल्याची चर्चा सुरु आहे. कारण मागील काही महिन्यांपूर्वी स्थानिक नागरिक आणि पुजाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. येथील VIP दर्शन सुविधेमुळे सामान्य लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे पूर्वीप्रमाणे दर्शन सुविधा सुरु करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती.

चार धाम यात्रेच्या प्लॅनवरुनही नागरिक नाराज असल्याचं बोललं जात आहे. चारधाम यात्रे संदर्भात केंद्र सरकारने मास्टर प्लॅन तयार केला आहे. यावर स्थानिकांमध्ये नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे. या ठिकाणी होणाऱ्या विकासकामांमुळे काय नुकसान होऊ शकते? याबाबत कोणताही अभ्यास केला नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. या कारणांमुळेच भाजपचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे.

2022 मध्ये काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर बद्रीनाथमधून राजेंद्र भंडारी विजयी झाले होते. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये जाण पसंत केलं. भाजपनेही त्यांना बद्रीनाथ मतदारसंघातून उमेदवारी दिली, पण भंडारी यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार लखपत बुटोला विजयी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT