MP Rajani Patil
MP Rajani Patil  Sarkarnama
देश

रजनी पाटील यांनी उपराष्ट्रपतींचं मन जिंकलं अन् सभागृह दणाणलं!

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : मराठीला (Marathi) अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा काँग्रेसच्या (Congress) खासदार रजनी पाटील (Rajani Patil) यांनी बुधवारी राज्यसभेत उपस्थित केला. यावेळी त्यांनी थेट उपराष्ट्रपती व राज्यसभा अध्यक्ष वेंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांनाच साकडं घातलं. 'तुम्ही तुमचे वजन वापरून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मोदी सरकारला सूचना द्या,' अशी विनंती पाटील यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर नायडू यांनीही मराठीतूनच 'तुम्ही चांगलं बोलला' असं म्हणत पाटील यांना दाद दिली. सभागृहातील इतर सदस्यांनीही मग बाके वाजवत पाटील यांच्या भाषणांच कौतुक केलं. (Parliament Session News)

फादर स्टीफन्स यांच्या ‘...तैसी भाषांमाजी साजिरी मराठिया‘ या काव्यपंक्तींचा दाखला देत पाटील यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. त्यांनी संपूर्ण भाषण मराठीतूनच केलं. पाटील म्हणाल्या, साडेबारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात अनेक जातीधर्माच्या लोकांची बोलीभाषा मराठी आहे. मराठी ज्ञानी लोकांची, विद्वानांची , कष्टकऱयांची, धर्माची भाषा आहे. अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी ही अजरामर भाषा आहे. सारे निकष पूर्ण करूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्राकडून अजूनही मिळत नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.

भारत सरकारने १५ वर्षांपूर्वी सर्वप्रथम तमिळला व नंतर संस्कृत, तेलुगु, कन्नड़, मल्याळम व ओडिशा या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठीमध्ये थोड्याथोडक्या नव्हे तर ५२ बोलीभाषा आहेत. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. यावर्षी त्या दिनाच्या निमित्ताने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने याबाबत सांस्कृतिक मंत्त्र्यांना प्रस्ताव पाठविला आहे. राज्याच्या रंगनाथ पठारे समितीने तयार केलेला अहवाल केंद्र सरकारला मान्य असून याबाबत सरकारचे धोऱण सकारात्मक आहे असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्त्र्यांनी लोकसभेतही स्पष्ट केले आहे, असा मुद्दा पाटील यांनी उपस्थित केला.

नायडू यांनी केलं अभिनंदन!

पाटील यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत थेट नायडू यांना साकडं घातलं. आपल्या मुद्याच्या समारोपात पाटील नायडू यांना म्हणाल्या की, 'तुम्ही ज्ञानी आहात. भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्नही करत असता. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी तुम्ही आपले 'वजन' वापरून केंद्राला तशी सूचना करावी,' अशी विनंती पाटील यांनी केली. त्यांच्या या टिप्पणीवर सभागृहात हास्याची लकेर उमटली. पाटील यांच्या या वजनदार भाषणाचं नायडू यांनीही कौतुक केलं. नायडू यांनी मराठीतूनच दाद देताना म्हटले की, ‘तुमचे अभिनंदन. तुम्ही चांगले बोलला आहात.' यावरही सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवरून पाटील यांना दाद दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT