Singer Sandhay Mukherjee  Sarkarnama
देश

ज्युनियर आर्टिस्टचा पुरस्कार मला नको! ज्येष्ठ गायिकेने नाकारला पद्मश्री

मोदी सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, यावरून आता मोठा गदारोळ सुरू झाला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा केली असून, यावरून गदारोळ सुरू झाला आहे. काही जणांनी पद्म पुरस्कार नाकारला असून, काहींना तो मिळाल्यावरून वाद सुरू झाला आहे. ज्येष्ठ बंगाली गायिका संध्या मुखर्जी (Sandhya Mukherjee) यांनी पद्मश्री नाकारला आहे. माझ्यापेक्षा ज्युनिअर आर्टिस्टला हा सन्मान द्या, असेही त्यांनी सरकारला सुनावले आहे.

संध्या मुखर्जी या 90 वर्षांच्या आहेत. त्या प्रसिध्द बंगाली गायिका आहेत. मुखर्जी यांनी हजारो बंगाली गाणी गायली असून इतरही डझनभर भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांना 2011 मध्ये बंगालमधील सर्वोच्च बंगभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांनी आता पद्मश्री नाकारला असून, माझ्यापेक्षा एखाद्या ज्युनिअर आर्टिस्टला हा सन्मान द्यावा, अशी जाहीर भूमिका त्यांनी घेतली आहे. माझ्यासाठी हा सन्मान योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पद्म सन्मान नाकारणाऱ्या पश्चिम बंगालमधील त्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. (Sandhya Mukherjee News Updates)

मुखर्जी यांच्या कन्या सौमी सेनगुप्ता यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. आईनेच हा पुरस्कार स्वत:हून नाकारल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, नव्वदाव्या वर्षी तिच्यासारख्या महान गायिकेला पद्मश्री पुरस्कार देणं, अपमानजनक आहे. पुरस्कार नाकारण्यामागे कोणतीही राजकीय भूमिका नाही. राजकारणापासून आई कोसो दूर आहे. त्यामुळे यामागे कोणतेही राजकीय कारण शोधू नये. तिला अपमानजनक वाटल्याने पुरस्कार नाकारला.

पश्चिम बंगालचे (West Bengal) माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Buddhadeb Bhattacharjee) यांनाही केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी अवघ्या दोन तासांत त्यांनी पुरस्कार नाकारला आहे. पुरस्कार जाहीर करण्याआधी आपल्याला कळवले नसल्याचे कारण देत त्यांनी हा पुरस्कार घेण्यास नकार दिला. त्यावरून आता उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

पद्मविभूषण पुरस्कार -

हा पुरस्कार जेष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर उत्तर प्रदेशचे दिवंगत माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह, जनरल बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका या तिघांनाही मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करण्यात आला आहे.

पद्मभूषण पुरस्कार -

१. गुलाम नबी आझाद, २. व्हिक्टर बॅनर्जी, ३. गुरमित बावा (मरणोत्तर), ४. बुद्धदेव भट्टाचार्य, ५. नटराजन चंद्रशेखरन, ६. क्रिष्ण इला आणि सुचित्रा इला, ७. मधुर जेफरी, ८. देवेंद्र झांजरीया, ९. राशीद खान, १०. राजीव मेहेरश्री, ११. सुंदर पिचाई, १२. सायरस पूनावाला, १३. संजया राजाराम (मरणोत्तर), १४. प्रतिभा रे, १५. स्वामी सच्चिदानंद, १६. वशिष्ठ त्रिपाठी

पद्मश्री पुरस्कार -

एकूण १०७ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे, यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा सन्मान होणार आहे. यात डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर), हिंमतराव बाविस्कर, सुलोचना चव्हाण, डॉ. विजयकुमार डोंगरे, सोनू निगम, अनिलकुमार राजवंशी यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT