VP Election of India: भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांचा विजय झाला आहे. त्यांना पहिल्या क्रमांकाची 452 मते मिळाली तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली.
या निवडणुकीत सी.पी. राधाकृष्णन यांचा 152 मतांनी विजय झाला. मात्र, निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून एक विषय चांगलाच चर्चेत आला आहे तो म्हणजे विरोधी पक्षातील 15 खासदारांची मतं फुटल्याचा. कारण या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डींना फक्त 300 मते मिळाली.
परंतू आघाडीच्या उमेदवाराला 315 मते मिळतील असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला होता. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांचा दावा फोल ठरला. याच मुद्द्यावरून आता विरोधी पक्षातील 15 खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा भाजपने केला आहे.
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी जयराम रमेश यांनी दावा केला होता. त्यावरून इंडिया आघाडीवर निशाणा साधला. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमघ्ये लिहिलं की, "विरोधकांच्या सर्व 315 खासदारांनी मतदान केलं. पण ते कुणासाठी केले हा खरा प्रश्न आहे. एवढी घोषणाबाजी करूनही त्यांच्या उमेदवाराला 300 मते मिळाली आहेत.
जयराम रमेश यांनी जास्तीची 15 मते मिळतील असा दावा केला होता तर मग ती मते कुठे गेली?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर 15 खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले आणि 15 खासदारांची मते अवैध ठरवली गेली म्हणजेच त्यांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यामुळे ती मते अमान्य ठरली. यावर आता काँग्रेसचे (Congress) खासदार शक्ती सिंह गोहिल यांनी आमची 15 मते अवैध ठरल्यामुळे आम्हाला फक्त 300 मते मिळाल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
तर दुसरीकडे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केलं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि पंजाबमदील खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय अनेकांना आहे. कारण भाजपने या राज्यात उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मोठी फिल्डिंग लावली होती.
भाजपच्या (BJP) याच प्रयत्नाना यश आल्याचं बोललं जात आहे. कारण महाराष्ट्रातील काही खासदार एनडीएबाबत सकारात्मक बोलत होते. तर केरळ, पंजाबसह इतर राज्यांतील काही नेते आपल्याच पक्षा विरोधात उघडपणे भूमिका मांडताना दिसत होते. त्यामुळे या राज्यातील खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मात्र, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचं मतदान अत्यंत गुप्त स्वरूपाचं असल्यामुळे कुणी क्रॉस व्होटिंग किंवा चुकीचं मतदान केलं हे उघड करता येत नाही. त्यामुळे केवळ संशय व्यक्त केला जातोय. उघडपणे किंवा ठोसपणे कुणावरही आरोप करता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.