Vice President election 2025 : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू असलेली मतदानाची प्रक्रिया संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिले मतदान केल्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत 97 टक्के खासदारांनी मतदान केले आहे. त्यातही विरोधकांच्या बाजूने मोठी अपडेट समोर आली आहे. विरोधी पक्षातील सर्व खासदारांनी मतदानात सहभाग घेतला आहे, त्यामुळे निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आहेत. तर सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना इंडिया आघाडीने उमेदवारी दिली आहे. या दोघांमध्ये लढत होत असून राधाकृष्णन यांना विजयासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचे स्थिती सुरूवातीपासूनच होती. पण इंडिया आघाडीकडून रेड्डी यांना उमेदवारी देत दक्षिणेतील पक्षांना अस्मितेच्या मुद्द्यावर कोंडीत पकडल्याची चर्चा होती.
प्रामुख्याने एनडीएसोबत असलेल्या तेलगू देसम पक्षाच्या खासदारांची मते रेड्डी यांना मिळतील, असा दावा आघाडीकडून केला जात आहे. तसेच सत्ताधारी पक्षातील अन्य काही पक्षांतील खासदारही रेड्डींना मतदान करतील, अशी आशा आघाडीला आहे. आघाडीकडे 315 खासदारांचे संख्याबळ आहे. आघाडीच्या 100 टक्के खासदारांनी मतदान केल्याची माहिती काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी दिली. विरोधकांनी शंभर टक्के मतदान केल्याने हा एकप्रकारे विक्रम असल्याची चर्चा आहे.
लोकसभा व राज्यसभेतील एकूण 781 खासदार मतदार आहेत. त्यापैकी बीजेडी, बीआरएस आणि शिरोपणी अकाली दलाने मतदान न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाचा आकडा 769 पर्यंत खाली आले आहे. त्यामुळे बहुमताचा आकडाही कमी झाला आहे. एनडीकडे बहुमतापेक्षा अधिक संख्याबळ असले तरी त्यातील अंतर कमी होते. त्यामुळे एनडीएकडून अधिकाधिक मतदान होण्यासाठी प्रयत्न केले जात होते.
मतमोजणीनंतर रात्री आठ वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. विजय कुणाचाही झाला तरी पुढील उपराष्ट्रपती दक्षिण भारतातीलच असणार आहेत. मात्र, या निवडणुकीमध्ये मागील काही वर्षांत पहिल्यांदाच मोठी चुरस आढळून आली. त्यामुळे नेमका निकाल काय लागणार, याची उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.