
How Sudan Durung Mobilized Youth Against the Government : नेपाळमध्ये युवकांच्या क्रांतीने सरकार उलथवून टाकले आहे. सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर युवकांचा संताप अनावर झाला अन् संपूर्ण नेपाळमध्ये सोमवारपासून धुमश्चक्री सुरू झाली. एकापाठोपाठ दहा मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर अखेर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनीही राजीनामा दिला. नेपाळमध्ये ही क्रांती घडवून आणण्यात 36 वर्षांचा एक तरूण आघाडीवर होता.
सूदन गुरुंग असे या युवकाचे नाव आहे. गुरूंग याने शाळकरी व महाविद्यालयी विद्यार्थ्यांना सरकारच्या धोरणाविरोधात शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. सोशल मीडियावर बंदी घालण्याची कुणकूण लागल्यानंतर त्याने सोशल मीडियातूनच हे आवाहन केले होते. त्याने ठिकाण आणि वेळही सांगितली होती.
विशेष म्हणजे गुरूंग यांच्या आवाहनानंतर हजारो तरूण सोमवारी काठमांडूच्या रस्त्यावर एकत्रित आले. आंदोलन शांततेत करण्याचे नियोजन होते. पण काहीवेळातच त्याला हिंसक वळण लागले अन् पोलिसांनीही अश्रूधुराची नळकांडी फोडत, रबरी गोळ्यांचा मारा करत आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलन अधिकच चिघळले.
मंगळवारीही आंदोलकांनी काठमांडूसह इतर शहरांमध्ये जोरदार हल्लाबोल करत पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्र्यांच्या घरांना टार्गेट केले. त्यानंतर ओली यांनी राजीनामा दिला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या गुरूंग यांनी नेपाळमध्ये क्रांती घडवून आणल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यांच्या आवाहनामुळे युवकांनी सरकारविरोधात आपला आवाज बुलंद केला होता.
कोण आहे गुरूंग?
सुदन गुरूंग हा 36 वर्षांचा तरूण असून हामी नेपाळ या स्वयंसेवी संघटनेचा अध्यक्ष आहे. सामाजिक कामांमधून त्याने आपली संघटना देशभर पोहचवली आहे. 2015 मध्ये देशात मोठा भूकंप झाल्यानंतर त्याने ही संघटना स्थापन केली होती. या भूकंपामध्ये त्याचा लहान मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेने गुरूंग याचे आयुष्यच बदलून टाकले आणि तो सामाजिक कामाकडे वळल्याचे सांगितले जाते.
सुरूवातीला गुरूंग हा विविध कार्यक्रमांचा संयोजक म्हणून काम करायचा. पण भूकंपानंतर तो सामाजिक कार्यकर्ता बनला. आपत्कालीन मदतीशिवाय विविध सामाजिक कामे करण्यास सुरूवात केली. काही शासकीय संस्थांमधील पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्याने यापूर्वी छोटी आंदोलने केली होती.
सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर तरूणाईचा रोष ओळखून त्याने आंदोलनाची हाक दिली अन् त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनाने गुरूंग याला जागतिक पातळीवर नेऊन ठेवले. देशातील सरकार उलथवून टाकण्यात त्याचे नेतृत्व कारणीभूत ठरले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.