Rahul Gandhi Protest outside of PM Modi House 
देश

Video: मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या राहुल गांधींचा पोलिसांनी थेट उचलून नेलं; जमिनीवर झोपून म्हटलं, आता लोकशाही संपली...

Rahul Gandhi Protest: संसदेवरील मोर्चादरम्यान तरुणाईला झालेल्या पोलिसांकडून मारहाणीच्या निषेधार्थ राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधीपक्षाच्या १२० खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केलं.

Amit Ujagare

Rahul Gandhi Protest: काल दिल्लीत जंतर-मंतरवरील निषेध आंदोलन आणि संसदेवरील मोर्चादरम्यान तरुणाईला झालेल्या पोलिसांकडून मारहाणीच्या निषेधार्थ लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार प्रियांका गांधी यांच्यासह विरोधीपक्षाच्या १२० खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं.

जवळपास साडेतीन चार तास चाललेल्या या आंदोलनानंतर पोलिसांनी जबरदस्तीनं या खासदारांना ताब्यात घेतलं आणि गाडीतून नेलं. यावेळी राहुल गांधी हे हटत नव्हते म्हणून पोलिसांनी त्यांना अक्षरशः उचलून घेतलं आणि गाडीत बसवलं, या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यावेळी राहुल गांधी यांची पोलिसांशी झटापटही झाल्याचं दिसून येत आहे.

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धरणे आंदोलनावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांची भेटही घेतली. पण राहुल गांधी हे आपल्या मागण्यांवर ठाम होते. सरकारच्या चर्चेनंतरही ते माघार घेत नसल्यानं जितेंद्र सिंह हे आंदोलनस्थळावरुन निघून गेल्यानंतर थोड्यावेळात तिथं अतिरिक्त पोलीस आले आणि त्यांनी या आंदोलक खासदारांना हटवण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यासाठी त्यांनी इथं बसलेल्या खासदारांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. पण जेव्हा पोलीस राहुल गांधी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करायला लागले तेव्हा ते खाली जमीनीवर झोपून राहिले. त्यामुळं त्यांना हटवणं पोलिसांना कठीण जात होतं.

दरम्यान, अखेर पोलिसांनी चारही बाजूनं राहुल गांधींना झोपलेल्या स्थितीतच उचललं आणि आपल्या पोलीस व्हॅनमध्ये नेलं. त्यांना पोलीस उचलत असताना काही माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी जमिनीवर झोपलेल्या अवस्थेतच पोलीस त्यांना उचलत असताना ते म्हणाले की, "आता देशातील लोकशाही संपली आहे"

सरकारला उत्तर द्यावंच लागेल

यावेळी काँग्रेसचं म्हणणं होतं की, पोलिसांनी विद्यार्थ्यांसोबत केलेल्या कारवाईसाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे. सरकारला या संपूर्ण प्रकरणासाठी उत्तर द्यावं लागेल. या आंदोलनावेळी दिल्ली पोलिसांनी अनेक काँग्रेसचे खासदार आणि नेत्यांना ताब्यात घेतलं. यानंतर तिथली परिस्थिती आणखीनंच आक्रमक झाली. यावेळी आंदोलन करत असताना राहुल गांधी यांची पोलिसांसोबत थोडीसी झटापटही झाली.

जितेंद्र सिंह यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

दरम्यान, चर्चेसाठी गेलेल्या जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधींवर टीका केली. आपल्या ट्विटर हँडलवर त्यांनी एक सविस्तर निवेदन शेअर केलं. यात त्यांनी म्हटलं की, राहुल गांधी जेव्हा पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करायला बसले तेव्हा त्यांनी केवळ संसदेत चर्चेची मागणी ठेवली होती. तसंच जर सरकार चर्चेसाठी तयार असेल तर आपण धरणे आंदोलन समाप्त करु असंही त्यांनी म्हटलं होतं. पण सरकारनं त्यांची ही चर्चेची मागणी मान्य केल्यानंतर त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची नवी मागणी केली.

पण काँग्रेसनं सरकारचा हा दावा खोडून काढला आहे. काँग्रेसनं म्हटलं की, काँग्रेसच्यावतीनं बऱ्याच काळापासून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि संसदेत चर्चेची मागणी अशा दोन्ही मागण्या केल्या जात आहेत. त्यामुळं सरकारचा हा आरोप बिनबुडाचा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT