इराण -इस्रायल युद्धाचा फटका गॅसनंतर पेट्रोलला बसला आहे. सध्या सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर दिसू लागला आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे देशात प्रीमियम पेट्रोल महागले असून त्याचे दर 2 ते 2.30 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. मात्र, सामान्य पेट्रोलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
नवीन दर 20 मार्च म्हणजे आजपासून लागू झाले आहेत. हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या प्रीमियर इंधनांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामध्ये एचपीसीएलचे पावर पेट्रोल आणि आयओसीएलचे एक्सपी95 यांसारख्या ब्रँडेड पेट्रोलचा समावेश आहे. हे पेट्रोल प्रामुख्याने चांगल्या इंजिन कार्यक्षमतेसाठी आणि अधिक मायलेजसाठी वापरले जाते.
दरवाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये प्रीमियम पेट्रोलचा दर 107 रुपयांवरून 112.30 रुपये प्रति लिटर झाला आहे. मुंबईत हा दर 115 रुपयांवरून 120.30 रुपये प्रति लिटरपर्यंत गेला आहे, तर चेन्नईमध्ये 112 रुपयांवरून 117.30 रुपये प्रति लिटर असा झाला आहे.
दुसरीकडे, सामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत पेट्रोल 103.50 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.03 रुपये आहे. तर दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 94.77 रुपये प्रति लिटर असून डिझेलचा दर 87.67 रुपये आहे.
प्रीमियम पेट्रोल म्हणजे जास्त ऑक्टेन असलेले इंधन. याचा ऑक्टेन नंबर साधारणपणे 95 किंवा त्याहून अधिक असतो, तर सामान्य पेट्रोलचा ऑक्टेन नंबर 91 असतो. त्यामुळे प्रीमियम पेट्रोल वापरल्यास वाहनाचे इंजिन अधिक स्मूथ चालते आणि कार्यक्षमता वाढते. हे पेट्रोल मुख्यतः मोठ्या शहरांतील पंपांवर उपलब्ध असते आणि स्पोर्ट्स बाईक, टर्बो इंजिन असलेल्या गाड्या तसेच उच्च कार्यक्षमतेच्या कारमध्ये वापरले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.