Wedding Fraud 
देश

Wedding Fraud News : बेड्या...लग्नाच्या नव्हे पोलिसांच्या! बोगस वधू-वर अन् बरंच काही... विवाह सोहळ्यातही भ्रष्टाचार

Rajanand More

Uttar Pradesh : सरकारी अनुदान लाटण्यासाठी बनावट बोगस कागदपत्रं दिली जातात. बोगस व्यक्तीही समोर उभ्या करून विविध योजनांतून अनुदान मिळवले जाते. पण ही केस थोडी वेगळी आहे. इथे थेट बोगस लग्न लावली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेही एक-दोन नव्हे तर शेकडो बोगस लग्न एकाचवेळी लावून अनुदान मिळवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. (Wedding Fraud News)

महाराष्ट्रासह (Maharashtra) देशातील अनेक राज्यांमध्ये सामुहिक विवाह सोहळ्यांच्या आयोजनासाठी अनुदान दिले जाते. त्यामध्ये विवाह सोहळ्याच्या खर्चाचा समावेश असतो. उत्तर प्रदेशातही (Uttar Pradesh) अशीच योजना आहे. त्यामध्ये 51 हजार रुपये दिले जातात. त्यापैकी 35 हजार मुलीला, दहा हजार लग्नाचे साहित्य खरेदी आणि 6 हजार रुपये सोहळ्यासाठी दिले जातात. हे अनुदान लाटण्यासाठी बोगस विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे समोर आले आहे.

उत्तर प्रदेशातील बलिया येथे 25 जानेवारीला या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात तब्बल 568 जोडप्यांचं लग्न झालं. त्यानंतर झालेल्या चौकशीत त्यातील अनेक जणांना पैसे देऊन सोहळ्यात आणण्यात आले होते. एका स्थानिक व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यात येण्यासाठी मुलांना 500 रुपये तर मुलींना दोन हजार रुपये देण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुलींनी स्वत:लाच घातले हार

विवाह सोहळ्यात अनेक मुलींच्या समोर कुणीच नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वत:लाच हार घातला. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. वर म्हणून सोहळ्यात आलेल्या अनेक मुलांनी तोंड झाकले होते. अनेक मुलीही तोंडावर पदर हटवतच नव्हत्या, असे असे स्थानिकांनी सांगितले.

विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या एका 19 वर्षीय तरुणाने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, मी हा सोहळा पाहण्यासाठी तिथे गेलो होतो. त्यांनी मला थेट लग्नाच्या मंडपात नेऊन बसवले. मला पैसे मिळतील, असे त्यांनी सांगितले. इतरांनाही अशाचप्रकारे आणले जात होते.

भाजपच्या (BJP) आमदार केतकी सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून दोन अधिकाऱ्यांसह 15 जणांना अटक करण्यात आली आहे. सर्व लाभार्थ्यांची पडताळणी करण्यास सांगण्यात आले आहे. चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. अजून चौकशी पूर्ण झालेली नाही, त्यामुळे कोणत्याही लाभार्थ्याला अनुदान मिळणार नाही, असे संबंधित अधिकाऱ्याने 'एनडीटीव्ही'शी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT