West Bengal election BJP candidate list 2026 Sarkarnama
देश

West Bengal Election: बंगालमध्ये मतदानाच्या आधीच वारं फिरलं! ममता बॅनर्जींना दिलासा,तर भाजपला मोठा धक्का; मतुआ समाज झटका देणार

Assembly Election 2026: भाजपच्या अंतर्गत गोटातही या परिस्थितीमुळे चिंतेचे वातावरण आहे. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या 77 जागांपैकी निम्म्याहून अधिक जागा या मतुआ आणि निर्वासित बहुल भागातून निवडून आल्या होत्या.

सरकारनामा ब्यूरो

Kolkata News: पश्चिम बंगालमधील मतुआ निर्वासितांना नागरिकत्व देण्याचे आश्वासन देऊन भाजपने आपली पाळेमुळे घट्ट केली होती. मात्र, मतदारयाच्यां विशेष सखोल पडताळणीनंतर (एसआयआर) प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदारयादीमुळे भाजपच्या या बालेकिल्ल्याला मोठे तडे गेल्याचे चित्र आहे. नादिया आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यांतील मतुआ समाजातील लाखो मतदारांची नावे यादीतून वगळल्याने या निर्वासित हिंदू पट्ट्यात राजकीय अस्वस्थता पसरली आहे.

2019 पासून पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विस्तारासाठी मतुआ समाज पूरक राहिला आहे. विशेषतः बनगाव, बागदा, गायघाटा, स्वरूपनगर, राणाघाट आणि कृष्णनगरसारख्या भागात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) आधारे भाजपने आपली भक्कम मतपेढी तयार केली होती. मात्र, आता याच भागातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत.

नागरिकत्वाच्या नावावर मते मागणाऱ्या भाजपला आता मतदारच जाब विचारत आहेत. ‘वर्षानुवर्षे नागरिकत्व मिळेल, या आशेने मतदान केल्यानंतर आता आमचे मतदानाचे अधिकारच हिरावले गेले आहेत. उद्या आम्हाला परके ठरवले जाणार नाही याची खात्री काय?’ असा सवाल गायघाटा येथील अशोक मंडल यांनी उपस्थित केला.

मतदारांच्या या नाराजीचा फटका भाजपला बसू लागला असून, बागदा येथील सुमारे 50 मतुआ कुटुंबांनी भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षणादरम्यान 12.3 लाखांहून अधिक नावे वगळण्यात आली आहेत. यात बनगाव उपविभागाला सर्वाधिक फटका बसला असून बागदामध्ये 55 हजार, बनगाव उत्तर आणि दक्षिणमध्ये 75 हजार, तर गायघाटात 39 हजार नावे वगळली गेली आहेत. नादिया जिल्ह्यातही हीच स्थिती असून, तेथे वगळण्यात आलेल्या नावांचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे.

भाजपच्या अंतर्गत गोटातही या परिस्थितीमुळे चिंतेचे वातावरण आहे. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या 77 जागांपैकी निम्म्याहून अधिक जागा या मतुआ आणि निर्वासित बहुल भागातून निवडून आल्या होत्या. ‘मतुआ मते विखुरली गेली, तर आमचा पाया कमकुवत होईल. आता उरलेले मतदार टिकवून ठेवणे आणि ज्यांची नावे वगळली गेली आहेत त्यांना पुन्हा यादीत समाविष्ट करणे हे आमच्यापुढील मोठे आव्हान आहे,’ असे बनगावमधील एका भाजप नेत्याने सांगितले.

दुसरीकडे, केंद्रीय मंत्री आणि बनगावचे खासदार शंतनू ठाकूर यांनी जनतेला घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. ‘कोणत्याही हिंदू निर्वासिताला वगळले जाणार नाही. आम्ही सर्वांना अपील करण्यासाठी मदत करत आहोत. प्रत्येकाला नागरिकत्व मिळेल आणि त्यांची नावे मतदारयादीत पुन्हा येतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मात्र, अखिल भारतीय मतुआ महासंघाचे महितोष वैद्य यांच्या मते, लोकांमध्ये संताप अन् गोंधळाचे वातावरण आहे. नागरिकत्वाचा प्रश्न सुटेल असे वाटत असताना आता पुन्हा कागदपत्रे घेऊन रांगेत उभे राहण्याची वेळ आल्याने लोकांमध्ये अस्वस्थता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT