Navi Delhi News : पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमधून भारताने पाकिस्तानचे कंबरडं मोडलं. पण या हल्ल्यानंतर सक्रीय झालेल्या केंद्रीय तपास यंत्रणांनी यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळल्या आहेत. तिची कसून चौकशी केली जात असून ज्योती मल्होत्राचं दहशतवादी हाफिज सईदशी कनेक्शन उघड झाले असून पेहलगाम हल्ल्यातील तिच्या सहभागाचा अँगलही आता आला समोर आहे. यामुळे आता देशातच एकच खळबळ उडाली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने कठोर पावले उचलत पाकिस्तानविरोधात कारवाई केली होती. यानंतर देशातील हालचालींवर तपास यंत्रणा आणि सायबर सुरक्षा विभागाने बारीक लक्ष ठेवले आहे. यादरम्याम यूट्यूबर ज्योती मल्होत्रासह 10 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. या 10 जणांवर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर सर्वांची कसून चौकशी केली जातेय.
ज्योती मल्होत्राला अटक करून चौकशी केल्यानंतर आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लॅपटॉप आणि चौकशीतून ज्योती हेरगिरीसाठी थेट पाकिस्तानमधील मुरीदकेमध्ये गेल्याचेही समोर आले आहे. फक्त ती तेथे जाऊन आली नसून तिने तेथे 14 दिवसांचे प्रशिक्षणही घेतल्याची माहिती आता उघड झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ती लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या दहशतवादी हाफीज सईदच्या सपंर्कात गेल्याचेही आता उघड झाले आहे. याची कबुलीच तिनेच दिल्याचेही आता बोललं जातंय.
सध्या ज्योती मल्होत्राची चौकशी IB आणि स्थानिक पोलिस करत असून आता एनआयए तसेच मिलिटरी इन्टेलिजन्स चौकशी करणार आहे. ज्योतीने दहशतवादी हाफीज सईद याच्या लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय असलेल्या मुरिदके येथे जाऊन प्रशिक्षण घेतलं होतं. ती तेथे 14 दिवस होती. तर हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही बाब उघड झाली असून तशी कबुली तिनेच दिली आहे.
दरम्यान ज्योती मल्होत्राच्या चौकशीतून आता पेहलगाम हल्ल्याचा अँगलही आला समोर येत असून ती हल्ल्याच्याआधी पहलगाम येथे गेली होती. ती येथे हल्ल्याच्या तीन महिने आधी गेली होती. तर ज्योती पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दानिश या कर्मचाऱ्याच्या हनीट्रॅपमध्ये अडकली आहे. तर दानिश इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) शी निगडीत आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरी आरोपानंतर ज्योती मल्होत्रा प्रकाश झोतात आली आहे. पण ती गुप्तचर विभागाच्या आधीच रडारवर असल्याचे माजी डीजीपींनी सांगितलं आहे. ज्योती मल्होत्रा सारख्या लोकांवर सुरक्षा एजन्सींचे बारीक लक्ष असतं. जे वारंवार पाकिस्तान, चीन आणि आता बांगलादेश सारख्या शत्रू राष्ट्रांना किंवा त्यांच्या उच्चायुक्तालयांना भेट देतात. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना संवेदनशील माहिती दिल्याच्या आरोपाखाली ज्योतीला 17 मे रोजी अटक करण्यात आली होती. ती याआधीच सुरक्षा एजन्सींच्या रडारवर होती, हे आता समोर आले आहे.
पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने हेरगिरांकडे विशेष लक्ष दिल्याचे आता उघड होत असून यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर अनेकांचा भांडा फोड झाला आहे. तीन राज्यात केलेल्या कारवाईत 11 दिवसांत एकूण 12 हेर पकडण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. या सर्वच हेरगिरांच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.