
Navi Delhi News : सध्या भारत-आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असून भारत पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलत आहे. देशातही कठोर पावले उचलताना देशविघातक कार्यवाही अथवा तशा कृत्यात सहभागी असणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जातायत. दरम्यान पंजाबमध्ये विविध ठिकाणी पोलिसींनी केलेल्या कारवाईत एका महिला युट्यूबरसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. यांच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर महिला युट्यूबरचे ISI च्या बड्या अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा संशय तपासात व्यक्त होत आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या महिला युट्यूबरचे नाव ज्योती मल्होत्रा असून ती भारतातील लोकप्रिय ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. तसेच तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. तर मल्होत्रा यांना देशविरोधी कारवाया आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ती 'ट्रॅव्हल विथ जो' नावाचे एक यूट्यूब चॅनल चालवते आणि तिच्या पाकिस्तान भेटीदरम्यान, ती आयएसआयच्या एजंट्सच्या संपर्कात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे, जे हरियाणा आणि पंजाबच्या वेगवेगळ्या भागातील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा यांनी 2023 मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी भेट घेतली होती. तर यांच्यात घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. दानिशच्या माध्यमातून ज्योतीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या इतर एजंटांशी झाली, ज्यात अली अहसान आणि जट्ट रंधावा ( ज्याचे खरे नाव शाकीर उर्फ राणा शाहबाज असे आहे) यांचा समावेश आहे.
यानंतर ज्योती व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून या एजंट्सच्या संपर्कात होती. तर सध्याच्या काळात ती सोशल मीडियावर पाकिस्तानच्या बाजूने प्रतिक्रिया देत होती. पाकिस्तान त्याचा वापर भारताविरुद्ध प्रचार आणि हेरगिरीसाठी करत होता. शिवाय काही अति संवेदनशील माहितीही तिने शेअर केल्याचे आता समोर येत आहे. यानंतरच तिच्यासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
तसेच गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील दानिश आणि त्याचा सहकारी अली अहसान यांनी तिची प्रवास आणि राहण्याची व्यवस्था केली होती. तर त्या ISI च्या बड्या अधिकाऱ्याबरोबर ती इंडोनेशियातील बाली येथे गेली होती. अटक करण्यात आल्यानंतर ज्योतीने आपल्या कबुलीजबाब भारतीय ठिकाणांशी संबंधित संवेदनशील माहिती शेअर केल्याची सांगितलं आहे. तसेच दिल्लीत राहताना ती पीएचसी हँडलर दानिशच्या संपर्कात होती हे ही सांगितलं आहे. यानंतर आता तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एहसान-उर-रहीम उर्फ दानिश हा पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचारी असून तो भारतात होता. पण त्याला हेरगिरीमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून 13 मे 2025 रोजी भारत सरकारने पर्सना नॉन ग्राटा घोषित केले आणि देश सोडण्याचे आदेश दिले.
हे संपूर्ण प्रकरण एका हेरगिरी मोहिमेचा भाग असून याप्रकरणी ज्योतीसह सहा नागरिकांचा सहभाग आहे. हे लोक हिस्सार, कॅथल, नूह (हरियाणा) आणि मालेरकोटला (पंजाब) येथे पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी आणि पीएचसी कर्मचाऱ्यांसाठी एजंट किंवा आर्थिक मदतनीस म्हणून काम करताना आढळले आहेत. ज्योती मल्होत्रा हिच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम 152 आणि अधिकृत गुपिते कायदा, 1923 च्या कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा तपास हिसार येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
हे प्रकरण ज्योतीपुरते मर्यादित नसून यात पंजाब आणि हरियाणातील लोकांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. यामुळे या प्रकरणात मोठ्या नेटवर्कचा आता पर्दाफाश झाला असून ISI ने भारतात स्लिपर सेल तयार केल्याने दिसत आहे. तर ज्योतीसह अटक करण्यात आलेले सहाही पाकिस्तानी एजंटांच्या संपर्कात होते. ते त्यांच्यासाठी आर्थिक व्यवहाराचे माध्यम म्हणून काम करत होते.
या प्रकरणात ज्योती एकमेव महिला नसून गजाला या विधवा महिलेचा यात समावेश आहे. तिचा वापर पैसे पाठवण्यासाठी केला जात होता. गुजाला पंजाबमधील मालेरकोटला येथील रहिवासी असून तिने 23 एप्रिल 2018 रोजी तिचे लग्न मोहल्ला चोरमारा मालेरकोटला येथील रहिवासी इम्रान राणाशी झाले. पण 2020 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने इम्रानचे निधन झाले. यानंतरच गजाला पाकिस्तानी व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी फेब्रुवारी 2025 मध्ये गेली होती. दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात तिची ओळख दानिशशी झाली. यानंतर ते सतत व्हिडिओ कॉल आणि चॅटिंगद्वारे संपर्कात राहिले. याचवेळी ती दानिशच्या प्रेमात पडली. आणि जशे दानिशने सांगितले तसेच केलं. तिने काही लोकांना पैसे पाठवले. यानंतर 23 एप्रिल 2025 रोजीच्या दानिशच्या भेटीनंतर गुजाला पाकिस्तानी व्हिसा मिळाला.
या प्रकरणात यामीन मोहम्मद, देविंदरसिंग ढिल्लन यांनाही अटक झाली आहे. देविंदरसिंग ढिल्लन याच्या चौकशीत त्याने पटियाला कॅन्टोन्मेंटचे व्हिडिओ पाकिस्तानला पाठवल्याचे आता समोर आले आहे. याशिवाय, हरियाणाच्या अरमानला देखील अटक करण्यात आली असून तो पाकिस्तानी एजंटांना भारतीय सिम कार्ड पुरवत होता. त्याने याधी डिफेन्स एक्स्पो 2025 ला भेट दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.