Devendra Fadnavis Sarkarnama
धडाकेबाज

Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीसांची कारकीर्द संघर्षशील; पण आलेख चढताच!

Devendra Fadnavis Chief Minister of Maharashtra : या विधानसभा निवडणुकीत यश मिळवताना देवेंद्र फडणवीसांच्या नावे आणखी एक विक्रम झाला आहे. तो म्हणजे सलग तीन निवडणुकांमध्ये भाजपा आमदारांची संख्या १०० च्या पुढे नेण्याचा. देवेंद्र फडणवीस २०१४ ला मुख्यमंत्री झाले तेव्हापासून २०२४ पर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास हा प्रचंड संघर्षांचा आहे.

Sachin Waghmare

Mumbai News: विश्वासार्हता व कार्यक्षमता यांच्या जोरावर फार कमी कालावधीत मूर्त बदल घडवून आणत, मोठा जनादेश प्राप्त करत देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय राजकारणाचा नवीन चेहरा अशी ख्याती मिळविली आहे. नागपूरचे कमी वयात महापौर, सहा वेळा आमदार, दोन वेळा मुख्यमंत्री, एक वेळा उपमुख्यमंत्री, भाजपची BJP संघटनात्मक जबाबदारी त्यांनी लीलया पेलली आहे. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्ष (२०१४ ते २०१९) मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे.

देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द अनेक चढ-उतार असलेली ठरली. मात्र, आता त्यांची कारकीर्द सोन्यासारखी झळाळली आहे. त्यांनी केलेल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवत महायुतीला बहुमत प्राप्त करून दिले. १३२ जागांवर भाजपचे आमदार विजयी झाले. तर महायुतीला २३९ जागांवर प्रचंड यश मिळाले. महाविकास आघाडीचा सुपडा साफ करीत त्यांनी हे यश मिळवले. महाराष्ट्राला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र गंगाधारराव फडणवीस हे लाभणार, हे स्पष्ट झाले आहे.

अवघ्या २१ व्या वर्षी झाले नगरसेवक

राजकारणात देवेंद्र फडणवीस यांनी कमी वयात प्रवेश केला. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी ते नगरसेवक झाले. पहिल्यांदा ते नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले तेव्हाच त्यांना सर्वांची खंबीर साथ लाभली. त्यांचा तरुण वयातील उत्साह आणि दूरदृष्टी जनतेचा विश्वास प्राप्त करण्यास कारणीभूत ठरले. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीचा आलेख नेहमी चढता राहिलेला आहे.

वयाच्या २६ व्या वर्षी झाले महापौर

काम करणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस जनमान्य झाले आहेत. तरुण वय, तडफ आणि सकारात्मक ऊर्जा यामुळेच त्यांची नागपूरच्या महापौरपदी वर्णी लागली. वयाच्या २६ व्या वर्षी महापौर झाले. फडणवीस यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्याशी असलेले संबध वडिलांपासूनचे आहेत. धैर्य, चिकाटी, शिस्तप्रियता, प्रचंड आत्मविश्वास आणि ध्येयासक्ती हे गुण देवेंद्र फडणवीस यांना वडिलांकडूनच मिळाले.

हे देखिल वाचा -

संघटनात्मक जबाबदारी पार पाडली

जेव्हा देवेंद्रजी नागपूरचे महापौर म्हणून कार्यरत होते. तेव्हाच महाराष्ट्राच्या महापौर समितीचे अध्यक्ष म्हणूनही ते निवडून आले. महाराष्ट्रामध्ये महापौरपदी सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव राजकीय नेते आहेत. २०१० मध्ये देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली. तर २०१३ मध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती केली.

सलग सहा वेळा आमदार

त्यानंतर ते कमी वयातच नागपूरमधून आमदार म्हणून निवडून आले. १९९९ पासून देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळात नागपूरमधून प्रतिनिधित्व करत आहेत. सध्या ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९ व २०२४ असे सलग सहा वेळा ते आमदार झाले आहेत.

कमी वयात झाले मुख्यमंत्री

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या निवडणुकीत स्वबळावर भाजपला मोठे यश मिळाले. १२२ जागी विजय मिळवल्याने वयाच्या ४४ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांचे नावे आहे.

अत्यंत संवेदनशील अशा मुख्यमंत्री पदाकरिता अनेक अनुभवी उमेदवार असताना या पदावर काम करण्याचा पूर्वानुभव नसूनही देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कमी वेळात स्पष्ट विचार, व्यवहारचातुर्य आणि इच्छाशक्तीच्या जोरावर नवीन गोष्टी त्वरित आत्मसात करण्याची व जटील प्रश्न सोडवित मार्गक्रमण करण्याची आपली क्षमता सिद्ध केली. विशेष म्हणजे या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपने १०० आमदारांची संख्या ओलांडली. ही घटना राजकीय इतिहासात नोंद करुन ठेवण्यासारखी आहे.

सर्व घटकांची मिळवली प्रशंसा

या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत साहजिकच समाजातील सर्व घटकांची प्रशंसा मिळवीत त्यांची जनमानसातील प्रतिमा अधिकच उजळली आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द खालील गोष्टींसाठी महत्त्वपूर्ण ठरली. विविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली. कोणतेही विशेष भ्रष्टाचाराचे प्रकरण वा घोटाळा उद्भवला नाही. कोणताही विशेष कायदा सुव्यवस्था वा अतिरेकी हल्ल्याचा प्रसंग उद्भवला नाही.

हे देखिल वाचा -

पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री जाहीर करण्याआधी एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार ही भाजपमधील बडी नेतेमंडळींची नावे चर्चेत होती. मात्र देवेंद्र फडणवीस हे नाव जाहीर झाले आणि त्यांनी सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करुन दाखवला. हा कार्यकाळ पूर्ण करुन दाखवणारेही ते अलिकडच्या काळातले ते एकमेव नेते आहेत. शरद पवार यांच्याकडे तीनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद आले होते.

मात्र, सलग पाच वर्षे मुख्यमंत्री होणं त्यांच्यासारख्या मुरलेल्या नेत्यालाही जमले नाही. २०१४ मध्ये सुरुवातीला राष्ट्रवादीने बाहेरुन दिलेल्या पाठिंब्यावर आणि त्यानंतर मग शिवसेनेबरोबर देवेंद्र फडणवीस सत्तेत राहिले. उत्तम प्रशासकीय कारभार कसा करतात ते देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं. मेट्रोचं स्वप्न, समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार योजना या आणि अशा अनेक योजना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या. या काळात तयांनी राबवलेल्या अनेक योजना लोकोपयोगी ठरल्या आहेत.

दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी हातमिळवणी करत महायुती म्हणून निवडणूक लढवली. २०१९ ला महाराष्ट्र विधानसभेत महायुतीच्या पाठीशी उभे राहिले. त्यावेळी युतीला १६१ जागा मिळाल्या. त्यात भाजपाने १०५ जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या होत्या. मात्र, उद्धव ठाकरेंनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरुन आग्रह सुरु केला.

त्यानंतर या सगळ्या चर्चा सुरु असतानाच २३ नोव्हेंबर २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अर्थात हे सरकार फक्त ७२ तास चालले कारण अजित पवारांसह आलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे गेले त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला.

सर्वाधिक आमदार असूनही बसले विरोधात

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते. तरीही देवेंद्र फडणवीस यांना विरोधात बसायची वेळ आली. त्या काळात फडणवीस यांनी अडीच वर्ष विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून कारभार पहिला. या अडीच वर्षांच्या कालावधीत झालेली अधिवेशनं विरोधी पक्षनेता म्हणून गाजवली.

या काळात त्यांनी मंत्री संजय राठोड, अनिल देशमुख आणि नवाब मलिक या तिघांची जी प्रकरणं देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर काढली. त्यामुळे महाविकास आघाडीची पुरती नाचक्की झाली. त्यामुळे या मंडळींना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यावेळी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दिलेल्या दरमहा १०० कोटींच्या खंडणीचं प्रकरण चांगलेच गाजले. यानंतर अनिल देशमुखांना तुरुंगातही जावं लागले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार बॅकफुटला गेले.

हे देखिल वाचा -

शिवसेनेतील फुटीमुळे घडला राजकीय भूकंप

२१ जून २०२२ ला शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना बरोबर घेऊन बंड केले. त्यानंतर २९ जून २०२२ ला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांची नाराजी प्रचंड वाढली होती. या नाराजीनंतर जेव्हा एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांशी संपर्क साधला तेव्हा त्यांना बळ देण्याचं काम भाजपाने केलं. ३० जूनला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

पहिल्यांदा झाले उपमुख्यमंत्री

एकनाथ शिंदे यांच्या सरकरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री झाले. ते मुख्यमंत्री होतील असे सर्वाना वाटत होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनाही सत्तेत यायचे नव्हतं. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांच्यवर टीका केली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाने दिलेला आदेश आणि जबाबदारी समर्थपणे सांभाळून दाखवली. अडीच वर्षांचं उपमुख्यमंत्रिपद त्यांच्या वाट्याला आले. त्यामध्ये भरीव कामगिरी केली.

अजित पवारांनाही घेतलं सोबत

त्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै २०२३ या दिवशी उभी फूट पडली. अजित पवार यांनी ४१ आमदारांसह महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांची साथ दुसऱ्यांदा सोडून ४१ आमदारांना बरोबर आणले. महायुतीची ताकद आणखी वाढवण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने केले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असा महायुतीचा पॅटर्न महाराष्ट्राने २०२३ नंतर पाहिला.

२०२४ ची लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला फटका

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त फटका बसला. महाविकास आघाडीने ३० जागा जिंकत महायुतीला बॅकफूटवर नेले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीला मोठे अपयश आलं. कारण महायुतीचे फक्त १७ खासदार महाराष्ट्रातून निवडून आले. भाजपाच्या २२ खासदारांची संख्या थेट ९ वर आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारीही दाखवली. मात्र, केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवला. ज्या नंतर देवेंद्र फडणवीस जोमाने कामाला लागले त्यांना मोठे यश मिळाले.

विविध योजनेचा झाला फायदा

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत १३२ जागांवर भाजपाचे आमदार विजयी झाले. तर महायुतीला २३९ जागांवर प्रचंड यश मिळाले. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. या निवडणुकीच्या प्रचाराचे पाच महिने होते त्यात देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने टार्गेट करण्यात आले. मनोज जरांगे यांनीही मराठा आरक्षण न देण्यासाठी फडणवीस कसे जबाबदार आहेत हे सातत्याने सांगितले.

प्रत्येकाच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस होते. उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे, शरद पवार, नाना पटोले यांनी ही फडणवीस यांना निवडणुकीत पाडण्याचे आवाहन केले. या सगळ्यांनी टार्गेट करुनही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याऐवजी विकासकामं आणि जनतेशी संवाद सुरु ठेवला. विशेषतः या काळात लाडकी बहीण, युवा वर्ग, शेतकरी वर्गासाठी विविध यॊजना राबवल्या त्याचा मोठा फायदा झाला.

सलग तीनवेळेस भाजपा आमदारांची संख्या १०० च्या पुढे

या विधानसभा निवडणुकीत यश मिळवताना देवेंद्र फडणवीसांच्या नावे आणखी एक विक्रम झाला आहे. तो म्हणजे सलग तीन निवडणुकांमध्ये भाजपा आमदारांची संख्या १०० च्या पुढे नेण्याचा. देवेंद्र फडणवीस २०१४ ला मुख्यमंत्री झाले तेव्हापासून २०२४ पर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास हा प्रचंड संघर्षांचा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT