Shrikant Shinde .jpg Sarkarnama
फिटनेस

Shrikant Shinde : नेत्यांचा फिटनेस: खासदार श्रीकांत शिंदे म्हणतात; दिवसातला दीड तास स्वतःसाठी...

Shivsena MP Shrikant Shinde Fitness Update : शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात शिवसेनेचे काम अगदी जोमाने सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश त्याचेच प्रतीक आहे. त्यांचा मुलगा आणि खासदार असलो, तरी मी स्वतःला एक सामान्य कार्यकर्ता समजत असल्याने पक्षसंघटनेत खारीचा वाटा उचलण्याची जबाबदारी माझीही आहे.

सरकारनामा ब्यूरो

Shrikant Shinde Article : राजकारणी, खासदार असलो तरी सर्वप्रथम मी ‘हाडा’चा डॉक्टर आहे. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी सुदृढ जीवनशैली किती महत्त्वाची आहे, हे मी चांगल्याप्रकारे जाणतो. कामाचा कितीही व्याप असला, दौरे असले, झोपेचे-जेवणाचे वेळापत्रक विस्कटलेले असले तरी मी रोज किमान दीड तास स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी आवर्जून काढतोच.

यावेळेत मी जिममध्ये व्यायाम करतो किंवा घरीच योगा करतो. अगदी दौऱ्यावर कुठे असलो तरी किमान चालतोच. व्यायामासोबत आहारावरही लक्ष देत असल्याने थकवा जाणवत नाही; उलट जोमाने काम करण्याचे बळ मिळते. सगळ्यांनीच स्वतःसाठी दीड ते दोन तास काढायला पाहिजे... सांगत आहेत शिवसेनेचे (Shivsena) खासदार श्रीकांत शिंदे...

शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात राज्यात शिवसेनेचे काम अगदी जोमाने सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश त्याचेच प्रतीक आहे. त्यांचा मुलगा आणि खासदार असलो, तरी मी स्वतःला एक सामान्य कार्यकर्ता समजत असल्याने पक्षसंघटनेत खारीचा वाटा उचलण्याची जबाबदारी माझीही आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातील दौरे ओघाने आलेच.

यावेळी सभा घेणे, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणे, शाखांना भेटी देणे यांसारख्या गोष्टी अग्रक्रमाने कराव्या लागतात. वेळेचे बंधन कुठेच नसल्याने चेहऱ्यावर थकवा दिसता कामा नये, याचे भान ठेवावे लागते. कारण लोकप्रतिनिधी उत्साही असेल, तरच कार्यकर्त्यांमध्ये दुप्पट उत्साह संचारतो. ही किमया साधण्यासाठी शारीरिक आणि मानसिक फिटनेस हवा. म्हणूनच व्यायाम आणि आहारावर मी कटाक्षाने भर देतो.

राज्यातील दौरे हे पूर्वनियोजित असतात. त्यामुळे सकाळी जितके लवकर होईल, तितक्या लवकर आवर्जून उठतो. किमान दीड तास जिममध्ये व्यायाम करता येईल, असे वेळेचे नियोजन करतो. सायकलिंग आणि ट्रेडमिलवर धावतो. राजकारणात समोरच्याला घाम फोडायचा असेल, तर जिममध्ये आपला घाम निघालाच पाहिजे.

व्यायामाचे हे दोन प्रकार जरी केले, तरी कॅलरीज घटवण्यास मदत होते. शिवाय रक्तप्रवाह सुधारून दिवसभर उत्साही राहण्याची ऊर्जा मिळते; पण हे रोजच करणे शक्य होत नाही. अनेकदा ऐनवेळी कार्यक्रम हाती घ्यावे लागतात. त्यामुळे जिममध्ये जाता येत नाही, पण तरीही दीड तास स्वतःसाठी काढतोच. चालण्यावर भर देतो, पण काहीच जमले नाही, तर योग आणि ध्यानधारणा करतो. योग केल्याने थकवा जाणवत नाही. शरीर सुदृढ आणि मन प्रसन्न राहते. ध्यानधारणेमुळे वेळेचे नियोजनदेखील उत्तम पद्धतीने करता येते.

आहारात भाज्या, सलाड हवे...

व्यायामासोबतच आहारही तितकाच महत्त्वाचा असतो. हल्ली वेळेवर जेवण होत नाही, पण ताटात सर्व प्रकारच्या भाज्या, भरपूर सलाड असतील, याची काळजी घेतो. किंबहुना माझी आई आणि पत्नी ही काळजी अधिक घेतात. वेळेवर जेवण व्हावे, यासाठी प्रयत्न असतो. बहुतांशवेळा कार्यक्रमांमध्ये चहा किंवा दूधयुक्त कॉफी घेणे टाळतो. त्याला पर्याय म्हणून सकाळी ब्लॅक कॉफी घेतो. जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर असतो. दौऱ्यानिमित्त होणारा प्रवास, कार्यक्रमाच्या ठिकाणी एकंदरीतच दिवसभरात थोडे थोडे करत पाणी पितो. त्यामुळे शरीर डीहायड्रेट होत नाही. परिणामी तुम्हाला कुठेही थकवा जाणवत नाही.

घरचे जेवणच उत्तम

अनेकदा माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघात संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रम असतात. अशावेळी घरच्या जेवणाचा डबा सोबत कायम असतो. कार्यक्रमांदरम्यान थोडासा वेळ काढून जेवण करतो. जंक फूड, फास्ट फूड शक्यतो टाळतो. तसेच अन्य जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम असल्यास स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या घरी जेवण करतो. त्यामुळे बाहेरचे खाणे अधिकतर टाळले जाते आणि घरचेच जेवण मिळते.

‘निरोगी राहा, निश्चिंत राहा..!’

सध्या तरुण पिढी व्यायामाबाबत अधिक जागृत असल्याचे दिसते. जिमला जाणे, योगासने करणे, मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होणे, अशा उपक्रमांमध्ये तरुणवर्ग मोठ्या संख्येने दिसतात. ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. माझे ‘सरकारनामा’च्या माध्यमातून सर्व तरुणांना एकच आवाहन आहे, की तुम्हाला तुमच्या क्षेत्रात यश संपादन करायचे असेल, तर मन स्थिर हवे आणि शरीर सुदृढ हवे.

त्यामुळे निश्चितच तुम्ही सकारात्मक राहता आणि कोणतीही अडचण, अपयश आल्यास स्थिर मनाने उत्तम निर्णय घेऊ शकता. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि व्यसनापासून दूर राहणे ही त्रिसूत्री पाळली पाहिजे. निरोगी राहाल तरच निश्चिंत राहाल, हीच आरोग्याची उत्तम गुरुकिल्ली मी मानतो आणि अमलात आणतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT