Barsu Refinery Project Protest
Barsu Refinery Project Protest Sarkarnama
कोल्हापूर

Barsu Refinery Project News : बारसू रिफायनरी मुद्यावरुन ठाकरे गटात मतभेद ; स्थानिक आमदाराचा पाठिंबा

सरकारनामा ब्यूरो

Farmers Protesting MLA Rajan Salvi : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू सोलगाव येथील प्रस्तावित रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी हजारो स्थानिकांचे आंदोलन सुरु आहे. या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांनी विरोध करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

आंदोलनस्थळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या प्रकल्पावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली आहे. प्रस्तावित रिफायनरी जेथे होणार आहे त्या माळरानावर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी पाठिंबा दिला आहे.

रिफायनरीच्या मुद्यांवरून ठाकरे गटातील पदाधिका-यांमध्ये मतभेद असल्याचे दिसते. या रिफायनरीला राजन साळवींचा पहिल्यापासून पाठिंबा आहे, तर खासदार विनायक राऊत विरोधात आहेत. शिवसेना स्थानिकांच्या बाजूने असल्याचे पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणत असले तरी स्थानिक आमदार मात्र प्रकल्पाच्या बाजूने असल्याचे दिसते. (Latest Political News)

सोमवारपासून या रिफायनरी संदर्भात ड्रिलिंग करून मातीचे परिक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने सगळ्या परिसरात कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू झाली आहे.

आज (बुधवारी) राजन साळवी यांनी टि्वट करीत या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. "कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच....माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी त्यांच्यावर अन्याय करू नये," असे राजन साळवी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

या रिफायनरीमुळे माळरानावरची एका महिलेची शेती गेली. दोन दिवसापूर्वी आंदोलक करताना, उन्हामुळे चक्कर आल्यानंतरही तिने रुग्णालयात जाण्यासाठीही नकार दिला. राजापूरमधील महिलेने 'जीव गेला तरी इथेच थांबेन' असा इशारा दिला होता.

कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारी 'रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग' प्रस्तावित आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसेच नाटे या परिसरात नियोजित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT