Gokul Dairy Election 2026  Sarkarnama
कोल्हापूर

Gokul Dairy Election: संघर्ष जूना- मुद्दा नवा! डोंगळेंचा मुश्रीफांना इशारा, गोकुळमध्ये शिरल्याने ए. वाय पाटलांविरोधात ठिणगी पडली

Gokul Dairy Election : राधानगरी तालुक्यातून नेतृत्व कोणी करायचं यावरून देखील ए वाय पाटील आणि अरुण डोंगळे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. अशातच यावेळी झालेली विधानसभा निवडणूक व जिल्हा परिषदेची निवडणूक ही दोघांच्या संघर्षाला अधिकच कारणीभूत ठरली.

Rahul Gadkar

Kolhapur News: 'गोकुळ'च्या निवडणुकीत राधानगरी तालुक्यातून महायुतीत आमच्याशिवाय अन्य पर्यायांचा विचार झाल्यास आम्हाला गृहीत धरू नका. तालुक्यातील मतांची विभागणी टाळण्यासाठी ए. वाय. यांना घेतले जात असेल तर हवी तेवढी मते आम्ही देण्यास समर्थ आहोत; मग, नेते हवेतच कशाला? अशा शब्दांत गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनीं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना इशारा देत सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान डोंगळे यांच्या वक्तव्यावरून राधानगरी तालुक्यातच महायुतीला सुरुंग लागण्याची शक्यता आहे.

महायुतीत जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांचे नाव न घेता त्यांना थेट विरोध दर्शविला. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे या मेळाव्याचाही नूर बदलला. या मेळाव्याला मंत्री हसन मुश्रीफ यांचे विश्वासू व जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैय्या मानेही उपस्थित होते.

राधानगरी तालुक्यात महायुतीत ए. वाय. पाटील यांनी यावे, यासाठी माने प्रयत्नशील आहेत, त्यांच्या मध्यस्थीनेच या घडामोडी सुरू होत्या. दोन दिवसांपूर्वी ए. वाय. हे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या भेटीगाठीत त्यांच्यासोबत होते; पण ए. वाय. यांनी दुसरा विचार केला तर राधानगरीत मतांची विभागणी होईल, यासाठी त्यांना महायुतीत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घडामोडींचे पडसाद आज कासारवाडा मेळाव्यात उमटले.

डोंगळे यांनी आपली भूमिका करताना थेट इशारा देताना तालुक्यातून महायुतीत फक्त आमचाच विचार झाला पाहिजे, अन्य पर्यायांचा विचार झाल्यास आम्हाला गृहीत धरू नका, असे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली. त्यांच्या या इशाऱ्याने या तालुक्यात मध्यस्थीची भूमिका करण्याच्या हेतूने मेळाव्याला आलेले जिल्हा बँकेचे संचालक मानेही अवाक झाले. या तालुक्यातील उमेदवारीवर मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर व अन्य नेते चर्चेने मार्ग काढतील, असे सांगून यावर सारवासारव केल्याचे समजते.

डोंगळे आणि ए वाय पाटील यांच्यात संघर्ष का वाढला?

गोकुळ दूध संघामधील महायुती मधील संघर्ष अंतिम टप्प्यात आला असताना पुन्हा एकदा महायुतीमध्येच राधानगरी तालुक्यात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील यांना माहिती मध्ये घेण्यासाठी माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी विरोध दर्शवला आहे. या विरोधामागे गेल्या 20 ते 25 वर्षाचं राजकारण दडले आहे. राधानगरी तालुक्यातून नेतृत्व कोणी करायचं यावरून देखील ए वाय पाटील आणि अरुण डोंगळे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. अशातच यावेळी झालेली विधानसभा निवडणूक व जिल्हा परिषदेची निवडणूक ही दोघांच्या संघर्षाला अधिकच कारणीभूत ठरली.

मागील 35 वर्षाच्या राजकारणात अरुण डोंगळे यांनी गोकुळ मध्ये तर ए.वाय. पाटील यांनी जिल्हा बँकेचे नेतृत्व सांभाळलं. दोघांमधील समन्वयामुळे ए. वाय. पाटील यांचे गोकुळ मधील ठराव हे डोंगळेंकडे दिले जात होते. शिवाय एक वर्षांपूर्वी झालेल्या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळात ए. वाय. पाटील यांनी आपल्या कोट्यातून डोंगळे यांचे चिरंजीव अभिषेक डोंगळे यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. जिल्हा बँकेत पाटील नेतृत्व करत असताना नव्या रिझर्व बँकेच्या नियमानुसार दहा वर्ष संचालक राहणाऱ्या पाटील यांना संचालक पदाची संधी नाही.

या नियमामुळे ए वाय पाटील यांनी गोकुळ मध्ये संचालक होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीत अरुण डोंगळे यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना पाठिंबा दिला. त्यावेळी ए वाय पाटील हे स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात होते. राधानगरी तालुक्यातील नेतृत्व म्हणून पाटील यांना डोंगळे यांनी पाठिंबा देणे अपेक्षित होते. त्यांचे पडसाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमटले. अरुण डोंगळे यांची कन्या अमृता डोंगळे यांच्या विरोधात डोंगळे यांचेच पुतणे धीरज डोंगळे यांच्या पत्नी भाग्यश्री डोंगळे रिंगणात होत्या. त्यांना पाटील यांनीं पाठिंबा दिला. त्यामुळे साहजिकच पाटील यांच्यामुळे डोंगळे कुटुंबात संघर्ष निर्माण झाला. असा समज डोंगळे यांचा आहे.

राधानगरी तालुक्यातून मागील 35 वर्ष अरुण डोंगळे हे गोकुळ दूध संघाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र ए. वाय. पाटील यांनी गोकुळ मध्ये संचालक पद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने आपली गोकुळ मधील कारकीर्द अडचणीत येईल अशी भीती डोंगळे यांना आहे. शिवाय ठरावांची विभागणी राधानगरी तालुक्यातून झाल्याने त्याचा राग ही डोंगळे यांना आहे.

महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात अरुण डोंगळे आल्यानंतर ते शिवसेनेत दाखल होतील. असे चित्र निर्माण झाले होते. त्यावेळी ए वाय पाटील हे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत होते. मात्र लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

गोकुळ मधील अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर डोंगळे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्रीफ यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मंत्री मुश्रीफ यांच्या पाटील हे अधिक जवळचे आहेत. त्यामुळे पाटील यांना महायुतीमध्ये घेण्यासाठी मंत्रिमश्रीफ यांचे प्रयत्न सुरू आहेत. जर तसें झाल्यास राधानगरी तालुक्यातून नेतृत्व, गोकुळमधील स्थान संकटात येईल याच भीतीने पाटील यांना विरोध होत आहे की काय? अशी चर्चा आता दूध उत्पादकांमध्ये आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT