Satej Patil, Amal Mahadik Sarkarnama
कोल्हापूर

Kolhapur Politics : 'राजाराम'मधील मारहाणीमुळे कोल्हापुरातील राजकारण तापलं; प्रकरण फडणवीसांच्या कोर्टात

Amal Mahadik warns Satej Patil : 'राजाराम'चे अध्यक्ष अमल महाडिक यांचा सतेज पाटील यांना इशारा

Rahul Gadkar

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले नसले तर एप्रिल-मे मध्ये सार्वत्रिक निवडणुकांची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापू लागले आहे. याला कोल्हापूरचाही अपवाद नाही. कोल्हापूरमधील राजकीय (Kolhapur Politics) वाद आता उफाळून आलेला आहे. माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी आमदार सतेज पाटील यांना योग्यवेळी उत्तर देण्याचा इशारा देऊन भविष्यातील संघर्षाचा थेट इशारा दिला आहे. याला निमित्त ठरले आहे ते राजाराम कारखान्याच्या निवडणुकीचे!

राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना मारहाण झाली आहे. ही मारहाण सतेज पाटील (Satej Patil) यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप असून या प्रकारामुळे अमल महाडिक संतप्त झाले आहेत. या घटनेचे व्हिडीओ फुटेज आणि मारहाण करणाऱ्यांची नावे पोलिसांना कळली आहेत.

या घटनेची महाडिक यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता या वादात फडणवीस उडी घेणार काय, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'राज्यातील सत्ता बदललेली आहे, हे माजी गृहराज्यमंत्री विसरले आहेत. राजकीय वैर असावे पण, अशा पद्धतीने एकमेकांवर हात उगारणे योग्य नाही. महाडिक परिवाराने अशा पद्धतीने कुणालाच कधी मारहाण केलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना यापूर्वी कधीही घडलेली नाही. आम्ही आमच्या कार्यकत्यांना संयमाने राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. योग्यवेळ आल्यावर त्याला उत्तर दिले जाईल,' अशी प्रतिक्रिया अमल महाडिक यांनी दिली आहे.

राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या (Rajaram Sahakari Sakhar Karkhana) निवडणुकीतील पराभव सतेज पाटील यांना पचवता आलेला नाही, असा दावा करतच झालेला हल्ला नियोजित आहे, असा गंभीर आरोप अमल महाडिक यांनी केला आहे. काल रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटाचे कार्यकर्ते जिल्हा पोलिस कार्यालयाबाहेर थांबून होते. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कार्यकर्त्याना पांगवले.

वेळेवर ऊसतोड दिली जात नसल्याचा आरोप करत आमदार सतेज पाटील यांनी राजाराम कारखान्याविरोधात मोर्चा काढला. हा मोर्चा कारखान्याची बदनामी करण्यासाठीच काढला असून त्यातून कोणी प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा 'राजाराम'चे अध्यक्ष अमल महाडिक यांनी दिला आहे. एवढेच नाही तर सत्य समोर आणण्यासाठी जिथे खासगीकरण झाले आहे, त्या डी. वाय. पाटील कारखान्यावर आपणही मोर्चा काढू, असा इशाराही महाडिक यांनी दिला.

'राजाराम'विरोधात आमदार पाटील यांनी मोर्चा काढल्यानंतर महाडिक यांनी पत्रकार परिषद घेतला. ते म्हणाले, 'आज पोटनियम बदलाच्या संदर्भात प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्या कार्यालयात सुनावणी होती. या सुनावणीवर अप्रत्यक्षरित्या दबाव टाकण्यासाठी आजचा मुहूर्त साधून राजकीय भावनेतून प्रेरित असा हा मोर्चा काढण्यात आला. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन, अवकाळी पडलेला पाऊस, मराठा आंदोलन अशा अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचे तोडणी वेळापत्रक बिघडले आहे. पण केवळ 'राजाराम'बद्दल वाटणाऱ्या मत्सरातून हा मोर्चा विरोधकांनी काढला. परंतु, त्याला शेतकरी सभासदांचा थंडा प्रतिसाद मिळाला.'

'या मोर्चात शेतकरी कमी आणि कार्यकर्तेच जास्त होते. कारखान्याचे एकूण १५ हजार आहेत, यापैकी केवळ १५० लोक मोर्चाला उपस्थित होते. त्यातही २५ सभासद वगळता इतर कार्यकर्तेच होते. मूळ सभासदांचा कारखाना प्रशासनावर पूर्ण विश्वास असल्याचे महाडिक म्हणाले. उपस्थित २०-२५ सभासदांपैकीही बऱ्याच लोकांचा ऊस कारखान्याने नेला आहे. संदीप नेजदार यांचे उदाहरण देत विरोधकांपैकी अशा बऱ्याच लोकांच्या खात्यावर पैसेही जमा झाल्याची माहिती महाडिक यांनी दिली. यावेळी संचालक दिलीप पाटील, तानाजी पाटील, संतोष पाटील, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.

'दक्षिण'चे मैदान लांब

'कोल्हापूर दक्षिण विधानसभेची निवडणूक अजून लांब आहे. त्याआधी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्ष सज्ज झाले आहेत,' असेही महाडिक यांनी स्पष्ट केले. महायुतीतील तीनही पक्ष एकमताने कार्यरत असून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत याचा प्रत्यय येईल. सतेज पाटील नेतृत्व करत असलेल्या कारखान्यामध्ये काय परिस्थिती आहे, हे मी यापूर्वीही सांगितले आहे; पण त्यावर त्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही याकडेही महाडिक यांनी लक्ष वेधले.

श्रेय लाटण्याचा प्रयत्न

'उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून होणारी कामे श्रेय लाटण्यासाठी स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत,' असा टोलाही महाडिक यांनी लगावला.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT