eknath shinde, Satej Patil And kolhapur municipal corporation sarkarnama
कोल्हापूर

Kolhapur Election : दक्षिणच्या 'म्होरक्या'साठी काँग्रेसचं चक्रव्यूह, कोल्हापुरातली सर्वात हायहोल्टेज लढत 'या' प्रभागात दिसणार

Kolhapur politics : कोल्हापूर दक्षिणेत काँग्रेसने शारंगधर देशमुखांविरोधात राजकीय चक्रव्यूह रचला आहे. प्रभाग क्रमांक नऊमध्ये सतेज पाटील गट आणि शिंदे गट आमनेसामने येणार आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेची आरक्षण सोडत पार पडल्यानंतर जवळपास प्रत्येक मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असताना आता उमेदवारांची कोणत्या पक्षातून उमेदवारी घेतल्यास निश्चित होईल, त्याची जुळवाजुळव करण्याची घाई सुरू आहे. पुढील पाच ते दहा दिवसात या संदर्भातील चित्र स्पष्ट होणार असल्याने अनेकांनी मातब्बरांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

एका मतदारसंघातून चार प्रतिनिधी निवडून द्यायचे असल्याने एकमेकांवर हे उमेदवार अवलंबून आहेत. त्यामुळे सहकारी इच्छुक उमेदवाराकडे किती मतदार आहेत? त्याची लोकप्रियता? याचा अभ्यास केला जात आहे. मात्र कोल्हापुरातील एक असा प्रभाग आहे. जिथे कोल्हापूर महानगरपालिकेतील सगळ्यात हाय व्होल्टेज राजकारण पाहायला मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वच राजकीय पुढार्‍यांचं लक्ष असणार आहे.

कधीकाळी काँग्रेसचे गटनेते आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. दीड ते दोन महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक पक्षप्रवेशप्रसंगी जवळपास 35 आजी माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शारंगधर देशमुख हे प्रभाग क्रमांक नऊमधून निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. मात्र, त्यांना घेरण्यासाठी आता काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

मागील काही वर्षांमध्ये काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या कोल्हापूर दक्षिणच्या राजकारणात शारंगधर देशमुख यांची भूमिका महत्त्वाची होती. साम,दाम,दंड, भेद च्या राजकारणात देशमुख आघाडीवर होते. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक असो किंवा गोकुळच्या निवडणुकीत शारंगधर देशमुख हे आघाडीवर राहिले आहेत.

राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केली तर पत्रक काढून शारंगधर देशमुख हे त्या टिकीला प्रतिउत्तर देताना दिसले. त्यामुळे क्षीरसागर आणि महाडिक यांच्या देशमुख नजरेत राहिले. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अंतर्गत घडामोडीमुळे देशमुख यांनी सतेज पाटील यांची साथ सोडली.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली शारंगधर देशमुख यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे वारे वाहत असताना एका कार्यक्रमात झालं गेलं विसरून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे मांडीला मांडी लावून देशमुख यांच्यासोबत कॅरम खेळताना दिसले.

तर शिवसेनेच्या प्रत्येक बैठकीत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या बाजूला आता देशमुख बसतात. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो. हे या उदाहरणावरून दिसून येते. झालं गेलं ते गंगेला मिळाले, हेच डोळ्यासमोर ठेवून आता आगामी जिल्हा परिषद, महापालिकेतील राजकारणाची आखणी करताना हे तिघेही दिसत आहेत.

दुसरीकडे महायुती म्हणून निवडणूक एकत्र लढवायची की स्वतंत्र लढवायची याबाबत अजून स्पष्ट खुलासा नाही. मात्र शिवसेना आणि भाजपकडून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मातब्बर चेहरे महायुतीमध्ये घेण्याच्या प्रयत्नात आहे. फुलेवाडी, फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत आणि आंबई टँक या जुन्या प्रभागाचा मिळून एक प्रभाग क्रमांक नऊ असा झाला आहे.

भाजपकडून मानसिंग पाटील, अमोल पालोजी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नांत आहेत. तर सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांना भाजपमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर दुसरीकडे शिवसेना विजय देसाई यांना पक्षात घेऊन शारंगधर देशमुख यांच्या दिमतीला देण्याच्या तयारीत आहे. जर महायुती म्हणून एकत्र लढत झाल्यास मानसिंगराव पाटील किंवा त्यांच्या पत्नी, शारंगधर देशमुख, विजय देसाई त्यांच्यासोबत अन्य एक उमेदवार देऊन विजय सोपा करण्याच्या मार्गावर आहे

काँग्रेसच्या अडचणीच्या काळात साथ सोडलेल्या शारंगधर देशमुख यांच्याबाबत शांत बसतील सतेज पाटील कसले? काँग्रेस कार्यकर्त्यांनी आतापासूनच प्रभाग पोखरण्यास सुरुवात केली आहे. व्यक्तिगत गाठीभेटी, मतदारसंघात प्रबळ चेहरा, सामाजिक कार्यकर्ता शोधण्यासाठी काँग्रेसची टीम कामाला लागली आहे.

काँग्रेसकडून माजी नगरसेवक राहुल माने, माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. माने आणि बोंद्रे हे आणखी एका मतदारसंघातील उमेदवार असतील हे बोलले जाते. मात्र देशमुख यांच्या विरोधात तगडी फौज उभी करण्यासाठी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी विजय देसाई यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जर देसाई सोबत आले तर काँग्रेस देखील या प्रभागात प्रबळ ठरू शकते.

मात्र, मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहिले तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या प्रभागातील कौल हा महायुतीच्या बाजूने झुकला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती हे विजयी झाले असले तरी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पारड्यात अधिक मतदान झालेले दिसते. विधानसभा निवडणुकीत देखील हीच परिस्थिती होती. त्यामुळे सहाजिकच प्रबळ आणि इच्छुक उमेदवार हे महायुतीच्या बाजूला सरकतील असेच चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT