करकंब : घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ जनतेच्या अपार प्रेमामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन झालो. या काळात ज्या-ज्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या, त्या सर्व प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. इथून पुढच्या काळातही तुमच्यापुढे मांडलेले विकासाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी आणि मतदार संघाचा शाश्वत विकास करण्यासाठी संधी द्या. मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवतो, असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी दिले.
माढा मतदार संघास जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी, करोळे, जळोली, सांगवी, बादलकोट, नेमतवाडी, पेहे, नांदोरे, आव्हे, तरटगाव, या गावांचा प्रचारदौरा करून पाटील यांनी उंबरे आणि रोपळे येथे जाहीर सभा घेतल्या. उंबरे येथील जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, संभाजी ब्रिगेडचे किरण कचरे, नामदेव मुळे, विठ्ठल दगडे, किसन मुळे, विष्णू बागल, जीवराज चव्हाण, नागनाथ कानगुडे, शहाजी मुळे, सत्यवान मुळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पाटील यांनी सांगितले की, एकेकाळी औदुंबरअण्णांनी उसाचा दर जाहीर केल्याशिवाय राज्यातील एकही कारखानदार दर जाहीर करत नव्हता. त्यांचाच एक छोटासा कार्यकर्ता म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतल्यानंतर धाडसाने राज्यातील उसाच्या दराची कोंडी फोडली आणि तमाम शेतकऱ्यांना टनामागे साडेतीनशे ते चारशे रुपये जादा मिळवून दिले. परिणामी मागील तीन वर्षांत शेतकरी संघटनांना एकही आंदोलन करावे लागले नाही.
आगामी काळात 'फूड प्रोडक्ट' प्रकल्प उभारून उत्पादित मालाच्या निर्यातीतून शेतीकऱ्यांना परदेशी चलन मिळवून देऊ. सर्वात महत्वाचे म्हणजे सोलापूरसाठी समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याने पुढील काळात उजनीतून नदीला नियमित पाणी सोडले जाणार नाही. ही बाब लक्ष्यात घेऊन नदीवर ठिकठिकाणी दहा मीटर उंचीचे बंधारे बांधून पावसाळ्यात वाहून जाणारे २७ टीएमसी पाणी अडवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
याशिवाय राज्य आणि केंद्रशासनाच्या ९३६ योजना तळागाळापर्यंत पोचवणे, बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या व्यवसायांना चालना देणे, मतदार संघात सर्वच महापुरुषांचे पुतळे उभारणे, एमआयडीसीच्या माध्यमातून युवकांना रोजगार देणे, दोनच वर्षांत सर्व रस्ते पक्के करणे, अशी अनेक विकासकामे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पाटील यांनी राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचे जनतेला अजिबात आवडले नसल्याने लोकसभेला मतदारांनी महाविकास आघाडीचे बत्तीस खासदार निवडून दिल्याचे सांगून या विजयी खासदारांच्या कार्यक्षेत्रातील १९२ आमदार आघाडीचेच निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे माढा मतदारसंघाचा आवाज विधानसभेत घुमला पाहिजे, यासाठी निवडून देण्याचे आवाहन अभिजीत पाटील यांनी केले.
माढा मतदार संघात ज्यांनी तीस वर्षे सत्ता भोगली आणि मागील पंधरा वर्षांत पंढरपूर तालुक्यातील ४२ गावातील नेते व जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आले त्या शिंदे परिवाराने आपल्या तालुक्यातील एकाही नेत्याचा कधी माढ्यात सत्कार करतानाचा फोटो आपल्याला पाहायला मिळाला नसल्याचे सांगून त्यांनी फक्त मते घेतली पण मान दिला नाही, असे पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.